Theft : शेवगाव : तालुक्यातील बोधेगाव येथे शेवगाव-गेवराई रस्त्यालगत असलेल्या एका कृषी सेवा केंद्राचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी पावणेदोन लाखांचे कपाशी बियाणे व रोख रक्कम लंपास (Theft) केली. सदरील घटना मंगळवारी ( दि.११) पहाटे अडीचच्या सुमारास घडली. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV camera) चोरटे कैद झाले असून याप्रकरणी शेवगाव पोलिसांत (Police) फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
नक्की वाचा : हिंदू धर्मात प्रवेश केलेला शिवराम आर्य पुन्हा मुस्लिम धर्म स्वीकारणार; आर्थिक अडचणीमुळे निर्णय
१ लाख ७५ हजार ३८८ रूपयांच्या मुद्देमालाची चोरी
बोधेगाव पासून पश्चिमेस साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर शेवगाव-गेवराई रस्त्यालगत पेट्रोल पंपासमोर विष्णू गहिनीनाथ बोडखे (वय ४१) यांचे कृषी सेवा केंद्र दुकान आहे. सोमवारी सायंकाळी ते दुकानात बियाणे व इतर माल व्यवस्थित लावून नेहमीप्रमाणे दुकान कुलूपबंद करून घरी गेले. मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास चोरट्यांनी परिसरात लाईट नसल्याने अंधाराचा फायदा घेत शटरची लोखंडी पट्टी तोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील इन्व्हर्टरचे बटण बंद करून सीसीटीव्हीसह दुकानातील वीजपुरवठा खंडित केला. मग चोरट्यांनी दुकानातील प्रत्येकी ८६४ रूपये किंमतीचे १९२ नग कपाशी बियाणांचे पॅकेट, ५ हजार रुपयांच्या दोन सोयाबीन बीयांच्या बॅगा व गल्ल्यातील ४ हजार ५०० रूपये रोकड असे अंदाजे १ लाख ७५ हजार ३८८ रूपयांचा मुद्देमाल घेऊन तेथून पोबारा केला.
अवश्य वाचा : माळशेज घाटात कोसळली दरड;संगमनेर तालुक्यातील दोघांचा मृत्यू
तोंडावर अर्धवट रूमाल बांधलेले चोरटे कॅमेऱ्यात कैद (Theft)
मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास विष्णू बोडखे यांचे लहान भाऊ दुकानासमोरून जात असताना त्यांना दुकानचे शटर अर्धवट उघडे दिसले. त्यांनी तातडीने विष्णू बोडखे यांना फोन करून बोलावून घेतले. बोडखे हे तिथे आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. तेव्हा त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता तोंडावर अर्धवट रूमाल बांधलेले चोरटे कॅमेऱ्यात दिसून आले. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब गर्जे पुढील तपास करत आहेत.
चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी आधी रूमालाने अर्धवट तोंड बांधून घेतले. त्यानंतर हातातील गलोलीतून कृषी सेवा केंद्राच्या समोर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर दगडांचा मारा केला. काही दगड सीसीटीव्ही कॅमेऱ्याला लागले तर काही दगड शेजारील इमारतीवर जाऊन पडले. त्यानंतर एका कॅमेऱ्यावर रिकामी गोणी टाकून सीसीटीव्ही झाकण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याचे सीसीटीव्हीत दिसून येते.