Theft : नगर : राहाता तालुक्यातील मापारवाडी येथील शेतकऱ्याच्या शेतातील १० लाख रुपये किमतीची डाळिंबे चोरणाऱ्या (Theft) तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले. त्यांचे सात साथीदार मात्र पसार आहेत. आदिनाथ गोविंद माळी (वय २५, रा. धानोरा झरेकाठी, ता. संगमनेर), अमोल नामदेव पवार (वय २४, रा. म्हैसगाव, ता. राहुरी) व आनंद संजय पवार (वय १९, रा. चिंचोली फाटा, ता. राहुरी) अशी जेरबंद आरोपींची (Accused) नावे आहेत.
नक्की वाचा: शेवगावमधील शेअर मार्केट फसवणूक प्रकरणातील दोघे वृंदावनमधून जेरबंद
१४ टन डाळिंबांची चोरी
मापारवाडीतील विजय मापारी यांच्या तीन एकर शेतात १४ टन डाळिंब आले होते. या डाळिंबांची चोरी झाल्याची फिर्याद विजय मापारी यांनी लोणी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लोणी व राहाता परिसरातील रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेण्यास सुरूवात केली.
अवश्य वाचा: ‘मविआ’चा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा; उद्धव ठाकरे
सापळा रचून तीनही आरोपींना घेतले ताब्यात (Theft)
त्यावेळी पथकाला माहिती मिळाली की, डाळिंब चोरीचा गुन्हा आदिनाथ माळी व त्याच्या साथीदारांनी केला आहे. तो व त्याचे दोन साथीदार सध्या राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे एका चहाच्या टपरीवर बसले आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून तीनही आरोपींना ताब्यात घेतले.
पथकाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याच्या आणखी सात साथीदारांची नावे सांगितली. यात अविनाश सुभाष माळी, अजय जालिंदर माळी, शंकर पवार (सर्व रा. चिंचोली फाटा, ता. राहुरी), विकास काळे, पवन मधे, आकाश काळे (तिघे रा. म्हैसगाव, ता. राहुरी) व अवी गवळी (रा. गोदावरी वसाहत, ता. राहुरी) अशी पसार आरोपींची नावे आहेत. पथकाने पुढील तपासासाठी जेरबंद आरोपींना लोणी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.