Theft : जबरी चोरी करणारे दोघे आरोपी गजाआड

Theft : जबरी चोरी करणारे दोघे आरोपी गजाआड

0
Theft

Theft : नगर : जबरी चोरी (Theft) करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन दुचाकी व ५४ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. लहू वृद्धेश्वर काळे (वय १९, रा. सोनविहीर, ता. शेवगाव) व दिनेश अंगद भोसले (वय २२, रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड) अशी जेरबंद आरोपींची (Accused) नावे आहेत. हे आरोपी जेरबंद झाल्याने आठ गुन्ह्यांची उकल झाली आहे.

हे देखील वाचा : ‘मै हू डाॅन’ गाण्यावर सुजय विखे, कर्डिलेंचा तुफान डान्स; चाहत्यांचा एकच जल्लाेष

दाम्पत्याला अडवून चोरी (Theft)

वैष्णवी ठाणगे या त्यांच्या पतीसह १५ जानेवारीला दुचाकीवरून बाहेरगावी चालल्या होत्या. त्यांची दुचाकी कौडगाव (ता. नगर) येथे आली असता तीन व्यक्तींनी दुचाकीवरून येऊन ठाणगे दाम्पत्याला अडविले. वैष्णवी ठाणगे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा ऐवज जबरीने हिसकावून नेला. या संदर्भात वैष्णवी ठाणगे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला होता.

नक्की वाचा: मुख्यमंत्री साैर कृषी वाहिनी याेजनेला वेग; ४० हजार काेटींची गुंतवणूक, २५ हजार राेजगार

सापळा रचत अटक (Theft)

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घेतले. गुन्हा करण्याची आरोपींच्या पद्धतीनुसार माहिती मिळविली. त्याचं वेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, शेवगाव तालुक्यातील सोनविहीर येथील लहू काळे याने हा गुन्हा केला आहे. लहू काळे हा या गुन्ह्यातील चोरीचे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी बोधेगाव (ता. शेवगाव) येथील सोनाराकडे दुचाकीवर येणार आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोधेगाव येथे सापळा रचला. पथकाला दोन दुचाकीवर दोन संशयित दिसून आले. त्यांनी या संशयितांना थांबण्यास सांगितले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच या संशयितांनी काढता पाय घेतला. मात्र, पथकाने या आरोपींचा दोन किलोमीटर पाठलाग केला. तसेच संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत २ लाख ७० हजार रुपयांचे ५४ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल व ८० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.

आरोपींकडे पथकाने अधिक विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अशा स्वरुपाचे गुन्हे त्यांनी नगर व सोलापूर जिल्ह्यात आठ ठिकाणी केल्याचे त्यांनी सांगितले. हे गुन्हे त्यांनी विनोद जिजाबा भोसले (रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड) व कानिफ उद्धव भोसले (रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड) यांच्या सहाय्याने केल्याचे सांगितले. हे दोन्ही आरोपी पसार आहेत. जेरबंद आरोपींना पथकाने पुढील तपासासाठी नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here