Theft : नगर : नेवासा तालुक्यातील देवगड फाटा येथे रात्रीच्या वेळी जबरी चोरी (Theft) करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज जेरबंद केली. या टोळीकडून ५४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शाहरुख सत्तार खान (वय २३, रा. पानीविस कॉलनी, ता. जि. सातारा), दीपक लक्ष्मण भुसारे (वय २७, रा. रा. गोकुळवाडी, ता. जि. जालना) व ओंकार प्रफुल्ल ताठिया (वय २२, रा. वडगाव बुद्रुक, ता. जि. पुणे) अशी जेरबंद आरोपींची (accused) नावे आहेत.
हे देखील वाचा : जायकवाडीला सोडलेल्या पाण्याला स्थगिती द्या; संगमनेरात काँग्रेसचे आंदोलन
सोलापूर जिल्ह्यातील अजित गुळवे हे त्यांची पिकअप घेऊन छत्रपती संभाजीनगरमधून सोलापूरच्या दिशेने निघाले होते. यावेळी त्यांना झोप लागल्याने त्यांनी पिकअप रस्त्याच्या कडेला घेतली व ते झोपी गेले. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्ती तेथे आले. त्यांनी गुळवे व त्यांच्या वाहनावरील क्लिनरला मारहाण केली. तसेच मोबाईल व रोख रक्कम असा ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. गुळवे यांनी नेवासे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला.
नक्की वाचा : गारपीट, अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा : राधाकृष्ण विखे पाटील
स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करताना सीसीटीव्ही तपासले. तसेच कैदेतून सुटलेल्या आरोपींची माहिती घेतली. पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर शाहरुख व दीपकला जालना येथून तर ओंकारला वडगाव बुद्रुक येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरीचा ५४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पथकाने पुढील तपासासाठी आरोपींना नेवासा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.