Third Eye Asian Film Festival : नगरच्या मदारची ‘थर्ड आय एशियन फिल्म’फेस्टिव्हलसाठी निवड

'मदार' या चित्रपटाची मुंबई आणि ठाणे येथे होणाऱ्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलसाठी 'मराठी कॉम्पिटिशन' या विभागात निवड झाली आहे.

0
नगरच्या मदारची 'थर्ड आय एशियन फिल्म'फेस्टिव्हलसाठी निवड

नगर : ‘मदार’ (Madar) या चित्रपटाची १२ ते १८ जानेवारी २०२४ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे होणाऱ्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलसाठी (Third Eye Asian Film Festival) ‘मराठी कॉम्पिटिशन’ या विभागात निवड झाली आहे. अहमदनगर येथील मास कम्युनिकेशन (Mass Communication At Ahmednagar) या विभागाचे माजी विद्यार्थी मंगेश महादेव बदर (Mangesh Badr) यांनी मदार या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. तर चित्रपटाचे निर्माते अभिनेते मिलिंद शिंदे (Actor Milind Shinde), मंगेश बदर,मच्छिंद्र धुमाळ आहेत.

नक्की वाचा : अन्यथा मी जरांगे पाटलांसोबत आंदोलनात उतरणार; बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा

या चित्रपटामध्ये अमृता अग्रवाल,आदिनाथ जाधव,मिलिंद शिंदे,अनुजा कांबळे,अजिनाथ केवढे,भागाबाई दुधे व इतर कलाकार आहेत. मदार हा चित्रपट दुष्काळी भागातील जीवनशैलीवर आधारित आहे. मंगेश बदर यांनी या चित्रपटांमध्ये दुष्काळामधील गावातील माणसांचे आणि प्राण्यांचे जीवन चित्रित केले असून पाण्याअभावी होणारे हाल दाखवले आहेत. या चित्रपटासाठी रोहित नागभिडे यांनी संगीत दिले आहे.

मदार हा ९२ मिनिटांचा चित्रपट असून मोठ्या पडद्यावरील उत्कृष्ट कलाकृती आहे. महाराष्ट्र सरकारकडून ‘कान्स’ या चित्रपट महोत्सवासाठी या चित्रपटाची निवड झाली होती. तसेच महाराष्ट्र शासन,एमटीडीसी व पुणे फिल्म फाऊंडेशन आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मदारचा सहभाग होता. पिफमध्ये हा चित्रपट पाच पुरस्कारांचा मानकरी ठरला होता. लवकरच हा चित्रपट सर्व सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

अवश्य वाचा : भारतीय महिला संघाची कमाल ; ३४७ धावांनी उडवला इंग्लंडचा धुव्वा

मदार चित्रपटातील कलाकार व्यावसायिक कलावंत नसून ते दुष्काळी भागातील सर्व सामान्य लोक आहेत. चित्रपटात अभिनय करण्यासाठी त्यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानंतर या चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात आले. या कलाकारांमुळे चित्रपटात जिवंतपणा आला. हे कलावंत ज्या दुष्काळी भागातील हे लोक आहेत,त्याच दुष्काळी भागात चित्रपटाचे लोकेशन निवडले गेले आहे.असे मंगेश बदर यांनी सांगितले.

या चित्रपटात असं दाखवण्यात आले आहे की, दुष्काळामुळे ग्रामीण भागातील लोकांचे जीवन कसे जळते, उन्हाळ्यात पाल तापल्यासारखी नाती तप्त होतात. मातीत ओलावा असेल तर माणसातही गोडवा असतो. सलग दोन वर्षे पाऊस न पडल्याने गावातील लोक जगण्याचा मार्ग शोधत आहेत. मात्र तो मार्ग कायमस्वरूपी नसल्याने लोक शहराकडे जाऊ लागले. ते नदीच्या काठावर राहू लागतात. गावातील लोकांचे जीवनमान हे शेतीवर अवलंबून आहे आणि शेती पूर्णपणे पाण्यावर अवलंबून आहे. पाणी हे जीवन आहे तसेच पाणी नसेल तर जीवन अशक्य आहे. दुष्काळात अशा परिस्थितीत लोकांना धीर देण्याचे काम गावातील प्राध्यापक करत आहेत आणि तो जमेल तितकी मदत करतो. बायकोचं दुःख आणि गावाचं दु:ख या दोहोंमध्ये प्राध्यापक स्वत:ला सावरतो आणि गावाला सावरतो. मदार या चित्रपटात हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here