Tofkhana Police Station : नगर : रेल्वे उड्डाणपुलावर झालेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गेलेल्या तोफखाना पोलीस ठाण्यातील (Tofkhana Police Station) दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर (Police officer) १० ते १२ जणांच्या टोळक्याने मारहाण (Assault) केल्याची घटना गुरुवारी (ता.११) घडली.
नक्की वाचा : जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग
पोलीस अंमलदार बाळासाहेब भापसे व अविनाश बर्डे अशी मारहाण झालेल्या दोन कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु असून मारहाण करणाऱ्या टोळक्याची पोलिसांनी धरपकड सुरु करत ६ जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. नगर-कल्याण महामार्गावरील रेल्वेउड्डाणपुलाखाली गुरुवारी (ता. ११) रोजी सकाळी एका महिलेचा मृतदेह रेल्वेमार्गालगत आढळून आला होता. हा मृतदेह कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने कोतवाली पोलीस घटनास्थळी जावून पंचनामा करत असताना मृतदेह पाहण्यासाठी उड्डाणपुलावर नागरिकांनी गर्दी केली होती. काही वाहनचालकांनी पुलावरच त्यांची वाहने उभी केली होती. त्यामुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्याच वेळी पोलीस कर्मचारी भापसे व बर्डे हे एक नोटीस बजावण्यासाठी कल्याण रस्त्याने जात होते. उड्डाणपुलावर एकाने रस्त्यातच वाहन उभी केल्याचे पाहिल्यावर त्यांनी त्या वाहनधारकांना वाहन बाजूला घेण्यास सांगितले. याचा त्याला राग आल्याने पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच आपल्या इतर साथीदारांनाबोलावून १० ते १२ जणांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
अवश्य वाचा : रेल्वेमार्गासाठी आमदार किरण लहामटे यांचे अनोखे आंदोलन
सहा जणांना घेतले ताब्यात (Tofkhana Police Station)
घटनेची माहिती मिळताच शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी रुग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली असून सहा जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरु होते.



