Uddhav Thackeray : नगर : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये (Vidhanshabha Nivadnuk) महाविकास आघाडी राज्यात सर्वाधिक जागा जिंकणार, असा दावा खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केला. दरम्यान, लंके यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे माताेश्रीवर जाऊन आशीर्वाद घेतले. नगरमध्ये महाविकास आघाडीच्या मोठ्या मेळाव्याचे नियेाजन करण्यात येणार असल्याचेही लंके म्हणाले. खासदार लंके म्हणाले, ”लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशिर्वाद घेऊनच दिल्लीला शपथ घेण्यासाठी जाण्याचा मी निर्धार केलेला होता. रविवारी मी दिल्लीला जाणार आहे.
नक्की वाचा : अखेर लक्ष्मण हाकेंकडून उपोषण स्थगित
उद्धव ठाकरे यांची प्रेरणा
माझा राजकीय प्रवास हा शिवसेना पक्षातूनच सुरू झाला. शाखाप्रमुख, उपगणप्रमुख, गण, गट, उप तालुकाप्रमुख या पदांवर काम करताना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा घेऊन मी काम केले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही स्व. बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. नगर जिल्ह्यात कै. अनिल राठोड अशा नेतृत्वाखाली काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे आजही स्व. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांची प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो. पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची मागणी केली आहे. यावर बोलताना त्यांना काय करायचे असेल, ते करू द्या, काही लोकांना पराभव मान्य नसतो. त्यामुळे ते असे उलटे उद्योग करत असतात. त्याकडे दुर्लक्ष करून आपण आपले काम करत रहायचे, असे आपले धोरण आहे. उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर नगर जिल्ह्यातील सर्व बारा आमदार महाविकास आघाडीचे निवडून आणण्याचा आपण निर्धार केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येता आले नाही. याबाबत उद्धव ठाकरे यांनी खंत व्यक्त केली.
अवश्य वाचा : आता मृदा व जलसंधारण विभागातील पदांसाठी देखील होणार फेर परीक्षा
माताेश्रीबाहेर झळकला लंकेंचा फलक (Uddhav Thackeray)
पारनेरचा ढाण्या वाघ मातोश्रीवर, अशा आशयाचे डिझाईन करणाऱ्या तालुक्यातील सारोळा आडवाई येथील ग्राफिक्स डिझाईनर सुदेश आबूज याचा फलक मातोश्रीबाहेर झळकला होता. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.