Uddhav Thackeray : संगमनेर : “कितीही भ्रष्टाचार करा आणि भाजपात (BJP) या आपको कुछ नहीं होगा” हीच मोदींची गॅरंटी आहे. जितका मोठा भ्रष्टाचारी तितका मोठा सन्मान भाजपात मिळतो. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना गृहमंत्री नाही तर घरफोडे मंत्री म्हणायला पाहिजे. दुसऱ्यांचे घर फोडतात आणि स्वतःचे घर भरतात, अशी जहरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. संगमनेरात जनसंवाद यात्रेत ते बोलत होते.
हे देखील वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रात एकही सभा होऊ देणार नाही; मराठे काय आहे हे १५ तारखेनंतर पाहा, मनोज जरांगेंचा इशारा
जनसंवाद यात्रा संगमनेरात (Uddhav Thackeray)
उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरू केलेली जनसंवाद यात्रा संगमनेरात आली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, आमदार शंकरराव गडाख, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शहर प्रमुख आप्पा केसकर, नरेश माळवे, अमर कतारी, अमोल कवडे, जालिंदर लहामगे, पप्पू कानकाटे, अमित चव्हाण, अशोक सातपुते, गणेश धात्रक, रंगनाथ फटांगरे, काँग्रेसचे आर एम कातोरे, बाबा ओहोळ, निखिल पापडेजा, शैलेश कलंत्री, गौरव डोंगरे आदी उपस्थित होते. माजी शहरप्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरातून अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज पासून बसस्थानक परिसरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
नक्की वाचा: मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यात बंदची हाक
अमित शहा यांनी ते वचन तोडले म्हणून मला संताप (Uddhav Thackeray)
ठाकरे म्हणाले, आमची पंचवीस तीस वर्षे वाया गेलेत. यांच्या हिंदुत्वाच्या बुरख्याला आम्ही फसलो त्यांना दिल्लीत पाठवले. तेथे गेल्यानंतर यांनी आमच्याच मुळावर घाव घातला. ही त्यांची वृत्ती बघितल्यानंतर भाजप व आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी सावध व्हायला पाहिजे. ज्या शिवसेना प्रमुखांनी संकटात असताना ज्या मोदींना वाचवले तेच आता शिवसेना संपवायला निघाले आहेत. हे नुसते मित्रांना संपवत नाही तर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी फोडली. नितीशकुमारला परत घेतले. असा घणाघात करत शिवसेना संपत नाही म्हणून शिवसेना फोडली असे त्यांना वाटतेय. मात्र, ज्या भ्रष्ट लोकांविरुद्ध भाजपाने आजपर्यंत बेंबीच्या देठापासून आरडाओरडा केला. त्यांचीच धुणी आता त्यांना धुवायला लागत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांची मला दया येते. ज्यांना भ्रष्ट म्हणून ज्यांच्या अंगावर तुम्ही चिखल उडवला त्यांचीच धुणी- भांडी करण्याची वेळ तुमच्यावर आली आहे, अशी मिश्किल टीका ठाकरे यांनी केली. भारतीय जनता पक्षाने मला दिलेले वचन तोडले हे सत्य आहे. अमित शहा यांनी माझी भेट घेऊन अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाची बोलणी केली होती. या तत्वानुसार आम्ही युती केली. निवडणुकीनंतर आम्ही पत्रकार परिषद घेतली. आता ते म्हणताय मी पक्ष प्रमुखच नाही आहे. मग त्यावेळी माझ्याकडे का आला होता? मोदींजींना आमची ठाकरे घराण्याची घराणेशाही माहिती नव्हती का? तरी देखील अमित शहा यांनी येऊन वचन दिले आणि त्यांनी ते वचन तोडले म्हणून मला संताप आला. कारण मी कधी खोटे बोललो नाही, बोलणारही नाही. त्यांनी युती तोडली, वचन तोडले, असे ठाकरे म्हणाले.