Unseasonal rain : संगमनेर : शहरासह तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) फटका बसला आहे. बुधवारी (ता.२) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक आभाळ दाटून आले. काही वेळातच सोसाट्याचा वारा सुटून विजेच्या कडकडाटासह (Lightning strikes) पावसाला सुरुवात झाली. शेतामध्ये काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले. तसेच कवठे धांदरफळ येथे वीज पडून दोन गाईंचा मृत्यू (Death) झाला. तर वीटभट्टीवर पाणी साचल्याने भट्ट्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नक्की वाचा : लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली नवी माहिती
काही गावांमध्ये गारपिट होऊनही नुकसान
संगमनेर शहर, संगमनेर खुर्द, कासारा दुमाला, खांडगाव, निमज, गुंजाळवाडी, घुलेवाडी, सावरगाव तळ, चंदनापुरी, हिवरगाव पावसा, निमगाव टेंभी, देवगाव, मिर्झापूर, धांदरफळ खुर्द, धांदरफळ बुद्रुक, नांदुरी दुमाला, नांदूर खंदरमाळ, घारगाव आदी गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला. काही गावांमध्ये गारपिट होऊनही नुकसान झाले. तसेच तालुक्यातील इतर गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. कवठे धांदरफळ येथे वीज पडून दूध उत्पादक शेतकरी सुशांत निवृत्ती घुले यांच्या दोन गाईंचा मृत्यू झाल्याचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी सांगितले. मिर्जापूर परिसरातील गावांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने गहू, कांदे, द्राक्ष, टोमॅटो, बाजरी, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अवश्य वाचा : “मराठी गया तेल लगाने”, असे म्हणणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांनी चांगलीच घडवली अद्दल
पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच उडाली धांदल (Unseasonal Rain)
दुपारी साडेतीन वाजता अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. काढलेल्या शेतमाल झाकण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ सुरू होती. सावरगाव तळ परिसरात ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच येथील शेतांमध्ये पाणी साचल्याने ही पिकांचे नुकसान झाले. हिवरगाव पठार आणि परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने काढलेला कांदा भिजला आहे. आता कांदा भिजल्याने तो चाळीत साठवणे शक्य नाही. त्यामुळे कांदा तातडीने विकावा लागणार असून कांद्याला सध्या पाहिजे तितका भाव नसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.