Unseasonal Rain : पाथर्डी : अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) पाथर्डी (Pathardi) शहरातील नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. सध्या शहरात भूमिगत गटारी व जलवाहिनीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. या कामात काढलेली माती रस्त्यावर पसरल्याने ठिकठिकाणी चिखल साचला असून नागरिकांना चिखलातून वाट काढावी लागत आहे.
अवश्य वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये इस्रोची एन्ट्री; पाकिस्तानच्या हालचालीवर इस्रोच्या १० उपग्रहांची नजर
उपनगरांमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर
विशेषतः शहरातील उपनगरांमध्ये ही परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. उपनगर भागात मातीमुळे रस्ते चिखलमय झाले असून त्यामध्ये दुचाकी व चारचाकी वाहने अडकत आहेत. काही भागांत नागरिकांना पायवाटेने चिखल तुडवत चालावे लागत आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यात साचलेला चिखल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोका निर्माण करत आहे. शहरातील जुने बसस्थानकाचे मागील वर्षी नूतनीकरण करून त्याचा परिसर अर्धवट डांबरीकरण करण्यात आला होता. मात्र, अवकाळी पावसात या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे अवकाळी पावसाळ्यात या परिसरात अधिक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
अवश्य वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले आदमपूर एअरबेसवर; जवानांशी साधला संवाद
वीज प्रवाह उतरल्यामुळे एका गोमातेचा मृत्यू (Unseasonal Rain)
दरम्यान, पाथर्डी शहरातील देखणे गल्ली येथे सोमवारी (ता.१२) दुर्दैवी घटना घडली. महावितरण कंपनीच्या एका वीज खांबामध्ये वीज प्रवाह उतरल्यामुळे त्या खांबाला स्पर्श झाल्याने एका गोमातेचा मृत्यू झाला. गोसेवक सोमनाथ बंग व रमेश बोरुडे यांनी सकाळी या गोमातेवर अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नगरपरिषद व संबंधित यंत्रणांनी पावसाळ्यापूर्वी योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.