प्रल्हाद एडके
Unseasonal rain : नगर शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागाला मागील दोन दिवसांत अवकाळी पावसाने (Unseasonal rain) झोडपले. यामुळे जिल्ह्यातील शेती पिके व फळबागांचे माेठे नुकसान झाले. महसूल विभागाच्या (Department of Revenue) आकडेवारीनुसार १६८ गावांमधील तब्बल १५ हजार ३०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात बाधित शेतकऱ्यांचा आकडा २१ हजार १२४ इतका आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या या अवकाळी पावसामुळे पारनेर, श्रीरामपूर, अकोले, कोपरगाव, संगमनेर, पाथर्डी आणि राहाता तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. श्रीरामपूर शहरासह तालुक्यात रविवारी (ता.२६) सायंकाळी सहा वाजेनंतर वादळी वारा (stormy wind) व विजांच्या कडकडाटत पाऊस झाला.
मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या जोरदार पावसामुळे खंडाळा गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पारनेर तालुक्यात गारपीट व अवकाळी वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे ज्वारी, कांदा ही पिके भुईसपाट झाल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. पारनेरसह पानोली, सांगवी, सूर्या, जवळा, निघोज, करंदी, वडझिरे, चिंचोली, हंगा, वडनेर हवेली, राळेगण, थेरपाळ, पिंपळनेर, गुणोरे, गांजीभोयरे या ठिकाणी गारपीट झाली. पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांत काढणीला आलेली पिके व इतर शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
हे देखील वाचा: ..ती राजकीय चूक झाली, नाहीतर राज्यात भाजपची सत्ता आली नसती; माजी मुख्यमंत्र्यांची कबुली
या पावसाने अनेक ठिकाणी घरांचे तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचना दिल्यानंतर महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर पंचनामे करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पारनेर तालुक्यातील अवकाळीग्रस्त गावांना भेटी देत झालेल्या नुकसानीची नुकतीच पाहणी केली. जिल्ह्यात १०७ गावात पावसामुळे ८५७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यात आणखीन ६१ गावांची भर पडून गावांची संख्या १६८ वर पोहोचली. एकूण १५ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
नगर जिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्याने अनेक पिके वाया गेली होती. मात्र, या परिस्थितही काही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने जपलेल्या पिकांचे या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.
नक्की वाचा: वर्षश्राद्ध आंदोलन तात्पुरते स्थगित