Unseasonal Rains : राहाता : अवकाळी पाऊस (Unseasonal Rains), गारपीट व वादळामुळे राहाता तालुक्यासह जिल्ह्यात झालेल्या शेतपिकांच्या आणि अन्य नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने (Revenue and Agriculture Departments) एकत्रितपणे १०० टक्के पंचनामे करून अहवाल सादर करावेत, असे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Dr. Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रशासनाला दिले.
नक्की वाचा : निसर्गाशी मैत्री करा आणि आनंदी रहा: पद्मश्री राहीबाई पोपेरे

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी
गुरुवारी (ता. २) जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडून नुकसानीची माहिती घेतली. तसेच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी पाथरे येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. राहाता तालुक्यातील पाथरे येथील शेतकरी संजय भाऊसाहेब घोलप व सोपान घोलप यांच्या शेताला व गोठ्याला पालकमंत्र्यांनी भेट दिली. वादळी वाऱ्यामुळे विजेची तार अंगावर पडून नऊ गायी दगावल्याच्या दुर्दैवी घटनेची त्यांनी पाहणी केली. मंत्री विखे पाटील यांनी घोलप कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना धीर दिला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश (Unseasonal Rains)
यावेळी ‘घोलप कुटुंबीयांना सर्वतोपरी सहकार्य करून शासन स्तरावरून तातडीने मदत कशी मिळेल, यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत,’ अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच, वादळाने पडलेल्या वीजवाहक तारा व विजेच्या खांबांच्या समस्या तातडीने सोडवून गावातील वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देशही वीज वितरण कंपनीला दिले.राहाता तालुक्यात १८ मार्च, ३० मार्च व १ मार्चला झालेल्या पावसाने १ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावरील सुमारे २ हजार ७५९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये गहू, कांदा, द्राक्ष, मका, डाळिंब, हरभरा, टरबूज आणि आंबा या पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती पालकमंत्री विखे पाटील यांनी पाहणीनंतर दिली. याशिवाय शेतामध्ये ठेवलेल्या उत्पादित मालाचे तसेच वाऱ्यामुळे शेडनेट व पॉलीहाऊसचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
४२ हजार ६१८ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान
जिल्ह्यातील अन्य तालुक्यात झालेल्या पावसाने ४२ हजार ६१८ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी (ता. २) पुन्हा जिल्ह्याच्या बहुतांशी भागात झालेल्या पावसाने जामखेडमध्ये एक पशुधन दगावले असून, संगमनेरमध्ये दोन, राहुरीत नऊ आणि कोपरगावमध्ये एका घराचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे १०० टक्के पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. अजूनही काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला उत्पादित शेतमाल आणि जनावरे सुरक्षित स्थळी ठेवण्याबाबत शक्य तेवढे नियोजन करावे आणि संभाव्य नुकसान टाळावे, असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.
कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित
या पाहणी दौऱ्यावेळी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, संगमनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड, नायब तहसीलदार हेमंत पाटील, मंडळ कृषी अधिकारी रमेश चौपडे, सहायक कृषी अधिकारी मीना जाधव, वीज वितरण कंपनीचे अभियंता गाडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संपत तांबे उपस्थित होते. तसेच, बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब कडू, सरपंच उमेश घोलप, संचालक अशोकराव घोलप, आबासाहेब घोलप, भाऊसाहेब घोलप, आप्पासाहेब दिघे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.



