Vidyadhar Auti | पारनेर : न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पारनेरचे (Parner) माजी प्राचार्य आणि तालुक्यातील पुरोगामी चळवळीचे खंबीर नेतृत्व डॉ. विद्याधर भास्करराव औटी (Vidyadhar Auti) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ शैक्षणिक क्षेत्राचीच नव्हे, तर सामाजिक आणि वैचारिक चळवळीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाबद्दल पारनेर तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) व किसान सभेतर्फे ‘लाल सलाम’ अर्पण करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
समाजातील वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडली (Vidyadhar Auti)
डॉ. विद्याधर औटी यांनी आपले वडील, माजी आमदार कॉ. भास्करराव औटी यांच्या कम्युनिस्ट विचारांचा वारसा अत्यंत निष्ठेने जपला. त्यांनी केवळ पद भूषवले नाही, तर त्या पदाच्या माध्यमातून समाजातील वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडली. संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार समाजात रुजवण्यासाठी त्यांनी आपली संपूर्ण हयात खर्च केली. भारतीय संविधानातील मूल्ये सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवणे हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते.

अवश्य वाचा – कोरेगावच्या सरपंच निर्मला नवले यांचा धक्कादायक पराभव
नेटाने लढा दिला (Vidyadhar Auti)
समाजातील अंधश्रद्धा, प्रतिगामी विचार आणि जातीय-धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींविरुद्ध डॉ. औटी यांनी नेटाने लढा दिला. तालुक्यात सामाजिक सलोखा टिकावा, यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. ‘सावित्री-फातिमा विचार मंचा’च्या स्थापनेत त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. स्त्रियांच्या शिक्षणाचे आणि हक्कांचे विचार मांडताना त्यांनी सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांचा आदर्श नव्या पिढीसमोर ठेवला.
शेतकरी आणि कामगारांचे कैवारी (Vidyadhar Auti)
भांडवली व्यवस्थेत शेती, शेतकरी आणि कामगार वर्गाचे होत असलेले शोषण डॉ. औटी यांना अस्वस्थ करत असे. केवळ भाषणातूनच नव्हे, तर लेखनातूनही त्यांनी या समस्यांवर प्रकाश टाकला. महाराष्ट्रातील शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी सखोल अभ्यास करून पुस्तक लिहिले, जे आजही अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या जयंती उत्सवांना त्यांनी वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. राजमाता जिजाऊ, माता रमाबाई आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील संघर्षाची प्रेरणा तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. एक आदर्श शिक्षक, प्रशासक आणि लढाऊ कार्यकर्ता अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे ते सर्वांचे आदरस्थान बनले होते.
पारनेर तालुक्यावर शोककळा (Vidyadhar Auti)
डॉ. विद्याधर औटी यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि तालुक्यातील तमाम पुरोगामी जनतेच्या वतीने ‘अखेरचा लाल सलाम’ देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आणि दांडगा मित्रपरिवार असून, त्यांच्या निधनामुळे पारनेर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
हे पाहा – जिल्हा परिषदेवर भाजपचा डंका, शिवसेना दोन नंबरला, दादांची राष्ट्रवादी तीन नंबरला
डॉ. विद्याधर औटी हे पारनेर तालुक्यातील पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ होते. त्यांच्या जाण्याने एक वैचारिक पोकळी निर्माण झाली असून नव्या पिढीला प्रेरणा देणारे एक आदर्श व्यक्तिमत्व आपण गमावले आहे.
कॉम्रेड संतोष खोडदे.



