Vikhe Vs Kolhe | नगर : जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात दिग्गज असलेल्या विखे व कोल्हे (Vikhe Vs Kolhe) या कुटुंबातील राजकीय संघर्षाने आणखी एक नवे वळण घेतले आहे. युवा नेते विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताच राजकीय चाल खेळली. मात्र, या राजकीय चालीला काटशह देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे बंधू तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मॅनेजमेंट कॉन्सिलचे सदस्य राजेंद्र विखे पाटील राजकीय मैदानात उतरले आहेत. ते आज नाशिक येथे जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणातील विखे-कोल्हे राजकीय संघर्षाचा नवा अध्यायाची नांदी सुरू झाल्याची चर्चा आहे.
हे देखील वाचा: मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; नगर, शिर्डी लाेकसभेसाठी दीड हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती
कोल्हेंची राजकीय खेळी (Vikhe Vs Kolhe)
कोल्हे व विखे यांच्यातील राजकीय सत्तासंघर्ष जुना आहे. मात्र, या संघर्षाने उद्रेक घेतला तो २०१९च्या विधानसभा निवडणुकीने. या निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघातून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या विरोधात आशुतोष काळे निवडणूक लढवत होते. त्याच वेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे राजेश परजणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत ही निवडणूक तिरंगी लढतीची केली. त्यामुळे अप्रत्यक्षपणे आशुतोष काळे यांना राजकीय फायदा झाला. त्यामुळे काळेंच्या गळ्यात विजयाची माळ पडल्याची चर्चा आहे. हा पराभव कोल्हे कुटुंबाला जिव्हारी लागला. यातून स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजिव विवेक कोल्हे यांनी विखे विरोधक असलेल्या आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार नीलेश लंके यांची साथ घेत गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विखे गटाचा पराभव केला. मुळात गणेश कारखाना हा पूर्वी कोल्हे कुटुंबाकडेच होता. मात्र, तो कारखाना बंद पडल्यावर विखे गटाने हा कारखाना चालविण्यासाठी घेतला होता, असे सांगितले जाते.
नक्की वाचा: 100 टन सोनं ब्रिटनमधून आलं भारतात
‘तो’ पराभव जिव्हारी (Vikhe Vs Kolhe)
गणेश कारखाना निवडणुकीत व त्यानंतर विवेक कोल्हे यांनी विखे कुटुंबावर जोरदार टीका केली होती. ही टीका विखेंच्या जिव्हारी लागली. त्यामुळे विखे विरुद्ध कोल्हे असा राजकीय संघर्ष तापू लागला आहे. आमदार आशुतोष काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात आहेत. तर कोल्हे कुटुंब भाजपमध्ये आहेत. राज्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट या दोन्ही पक्षांची महायुती आहे. ही महायुती आगामी विधानसभा निवडणूक लढविणार आहे. ज्या पक्षाकडे विद्यमान आमदार त्यालाच ती जागा मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ही जागा आशुतोष काळेंना मिळण्याची शक्यता दाट आहे. अशा वेळी राजकीय कोंडी फोडण्यासाठी विवेक कोल्हे यांनी मधला मार्ग म्हणून शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवत नाशिकमध्ये जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. विवेक कोल्हेंचा अर्ज दाखल होताच विखे गटानेही राजेंद्र विखे पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी पूर्ण केली आहे. आज दुपारी १ वाजता ते नाशिकमध्ये जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
नक्की वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हल्लाबोल
दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ? (Vikhe Vs Kolhe)
नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे हे विद्यमान आमदार आहेत. नाशिक मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेत त्यांचे चांगले वजन आहे. या संस्थेच्या नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शाळा व महाविद्यालये आहेत. किशोर दराडे यांनी मागील पाच वर्षांत मतदारसंघात मोठे काम केले आहे. त्यांचा मतदारसंघातील पाचही जिल्ह्यातील शिक्षकांशी संपर्क आहे. दराडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेनेचा शिंदे गट असा राजकीय संघर्ष होऊ शकतो. विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. राजेंद्र विखेही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मागील निवडणुकीतही नगर जिल्ह्यातून जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचा फायदा दराडे यांना मिळाला होता. तोच कित्ता पुन्हा गिरविला जाणार का की नवीन सत्तासमीकरण अस्तित्वात येणार याची सध्या जोरदार चर्चा आहे.