नगर : विधानसभेसाठी उद्या (ता.२०) राज्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यातच विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे (Vinod Tawde) पैसे वाटप (Money Distribution) करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या (Bahujan Vikas Aghadi) कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला आहे. यावेळी भाजप आणि बविआचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याच पाहायला मिळाले. त्यामुळे पोलिसांनी हॉटेल सिल केले आहे. आमदार क्षितीज ठाकूर हे घटनास्थळी असल्याने येथील तणाव वाढला आहे. बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरून त्यांच्या अंगावरच पैशांची पाकिटे रिकामी केली.
नक्की वाचा : हास्य-विनोदाचा कल्ला करत’श्री गणेशा’चा टिझर प्रदर्शित
विवांता हॉटेलमध्ये काय घडले ?(Vinod Tawde)
विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आले होते. ते हॉटेलमध्ये महिलांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. ही गोष्ट सर्वत्र पसरली आणि कार्यकर्ते हॉटेलमध्ये जमू लागले. बविआचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले आणि वादावादी सुरू झाली. काही वेळातच आमदार क्षितीज ठाकूर देखील हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये सापडलेली पैशांची पाकिटे तावडे यांना दाखवली.
यावेळी भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडल्याने तणाव वाढला. त्यामुळे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अधिक कुमक मागवली. सध्या पोलिसांनी हॉटेल सिल केले. संतप्त झालेल्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरले. त्यांनी पैशांची पाकिटे पकडून त्यातील पैसे तावडे यांच्या अंगावर फेकले. तावडे यांनी या आरोप नाकारले आहेत. मी आयुष्यात कधी पैसे वाटले नाही,असे विनोद तावडे यांनी सांगितले.