पाथर्डी : शारदीय नवरात्र उत्सव (Navratri festival) कालावधीमध्ये मोहटादेवी देवस्थान (Mohatadevi Temple) ट्रस्टने मंदिर गाभाऱ्याच्या आतमधून देवीचे व्हीआयपी (VIP) दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयास प्रशासनाचे सहकार्य लाभले.
कुणीही मंदिर गाभाऱ्यातील दर्शनासाठी आग्रह धरू नये, नवरात्र कालावधीत सुमारे दहा लाख भाविक या ठिकाणी येत असतात. येणाऱ्या सर्व भाविकांना सर्व प्रकारच्या चांगल्या सुविधा देण्यासाठी संबंधित सर्व शासकीय विभाग प्रमुखांना सूचना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली. आगामी शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहटादेवी गडावर जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व शासकीय विभागप्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश तथा मोहटादेवी देवस्थान समितीचे अध्यक्ष सुनील गोसावी, पोलीस अधीक्षक राकेश ओला, न्यायाधिश अश्विनी बिराजदार, प्रांताधिकारी प्रसाद मते, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, तहसीलदार शाम वाडकर, विश्वस्त डॉ. श्रीधर देशमुख, विठ्ठल कुटे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे आदी उपस्थित होते.