नगर : विठ्ठल भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूरचे (Pandharpur) विठ्ठल- रुक्मिणी मंदिर आता भाविकांना मूळ रूपात पाहता येणार आहे. विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचे नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. येत्या २ जूनपासून (2nd June) भाविकांना पुन्हा पदस्पर्श दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
नक्की वाचा : दीपा कर्माकरने रचला इतिहास;’जिम्नॅस्टिक’मध्ये जिंकले पहिले सुवर्णपदक
विठ्ठल आणि रुक्मिणीच्या गाभाऱ्याचे काम पूर्ण (Vitthal Rukmini Mandir)
पंढरपूरचे विठ्ठल- रुक्मिणी मंदिर हे सातशे वर्षांपूर्वीचे जुने आहे.त्यामुळे या मंदिराकडे पुरातन ठेवा म्हणून पाहिले जाते. मंदिर संवर्धनाच्या कामासाठी राज्य सरकारने ७४ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. त्या अंतर्गत पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार मंदिर संवर्धनाचे काम सुरू आहे. मंदिरातील बहुतांश काम हे आता पूर्ण झाले असून उर्वरित काम देखील येत्या काही काळामध्ये पूर्ण होणार आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास अडीच महिन्यानंतर पुन्हा विठ्ठल भक्तांना आपल्या लाडक्या विठ्ठलाला पाहता येणार आहे.
अवश्य वाचा : सात-बारा उताऱ्यावर आईचंही नाव दिसणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
२ जूनला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विठुरायाची नित्य पूजा (Vitthal Rukmini Mandir)
मंदिर सुशोभीकरण आणि संवर्धन कामासाठी १५ मार्चपासून विठ्ठल- रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आले होते. मंदिरातील गाभारा, चौखांबी, सोळखांबी या भागातील काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता २ जूनपासून भाविकांना पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार आहे. २ जून रोजी पहाटे चार वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विठुरायाची नित्य पूजा करण्यात येणार असून त्यानंतर भाविकांना विठुरायाचे पदस्पर्श दर्शन घेता येईल.