Voter : नगर : अहिल्यानगर शहराच्या भवितव्याचा फैसला आज मतपेटीत बंद होत आहे. महापालिकेच्या (Ahilyanagar Municipal Corporation) ६३ जागांसाठी सकाळी ७.३० वाजेपासून ३४५ मतदान केंद्रांवर (Polling station) मतदान प्रक्रियेला सुरुवात झालीय. सकाळच्या कडाक्याच्या थंडीपासून सुरू झालेला हा प्रवास सायंकाळच्या उत्साहापर्यंत पोहोचला. दिवसाची सुरुवात संथ झाली. जानेवारीच्या कडाक्याच्या थंडीमुळे सकाळी मतदार (Voter) राजा घराबाहेर पडायला काहीसा कचरत होता. ११:३० वाजेपर्यंत केवळ ७.८७ टक्के मतदानाची नोंद झाली होती. मात्र, दुपार होताच चित्र बदललं आणि दुपारपर्यंत मतदानाचा (Voting) आकडा ४८.४९ टक्क्यांवर पोहोचला.
नक्की वाचा: महामार्गाच्या कामाचे ग्रहण दूर व्हावे यासाठी राहू केतूच्या मंदिरात अभिषेक
दोघांना शेकडो बनावट ओळखपत्रांसह पकडले
निवडणूक प्रक्रिया शांततेत सुरू असताना काही धक्कादायक घटनाही समोर आल्या. श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर प्रशालेत पक्षाच्या चिन्हांच्या चिठ्ठ्या वाटल्याचा आरोप झाला. नोडल अधिकारी यशवंत डांगे यांनी तातडीने धाव घेत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. आनंद विद्यालय केंद्रावर दोन संशयितांना शेकडो बनावट ओळखपत्रांसह पकडण्यात आले. या घटनेमुळे उमेदवारांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
अवश्य वाचा : खुनाच्या जेरबंद गुन्ह्यातील संशयित आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
९० वर्षांच्या आजींचे कडाक्याच्या थंडीत मतदान (Voter)
लोकशाहीच्या या उत्सवात खऱ्या अर्थाने लक्ष वेधलं ते ज्येष्ठ नागरिकांनी. ९० वर्षांच्या आजींनी कडाक्याच्या थंडीत मतदान केंद्रावर येत आपला हक्क बजावला. प्रभाग ७ मध्ये ९३ वर्षांच्या आजोबांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले. एका दृष्टी अधू असलेल्या आजोबांनी नातवाकडे मतदानासाठी हट्ट धरला आणि नातवानेही दुचाकीवरून नेऊन आपल्या आजोबांची इच्छा पूर्ण केली.
एका माऊलीने आपल्या पाच वर्षांच्या बाळाला कडेवर घेऊन मतदान केले आणि आईपण अन् कर्तव्य दोन्ही एकाच वेळी पार पाडले.पुण्यावरून आलेल्या लाडक्या बहिणी असोत किंवा पती नाशिकमध्ये आणि पत्नी अहिल्यानगरमध्ये मतदान करत असलेले जोडपे. लोकशाहीवरील विश्वास यातून अधोरेखित झाला. प्रभाग १७ मधील शोभा औटी यांनी आम्ही दिव्यांग असूनही मतदान केले, तुम्ही का नाही? असा रोकठोक सवाल मतदारांना विचारला.
आमदार संग्राम जगताप यांनी रामकृष्ण शाळेत मतदानाचा हक्क बजावला. तर ‘आय लव्ह नगर’चे संस्थापक नरेंद्र फिरोदिया यांनी मतदारांना बाहेर पडण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, निवडणुकीचा ताण बाजूला सारून भाजप नेते सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप निवांतपणे मिसळपाववर ताव मारताना दिसले. निवडणूक आता मतदारांच्या हाती आहे, आम्ही रिलॅक्स आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मुकुंदनगर आणि डॉन बॉस्को स्कूलमध्ये मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मनपा प्रशासनाने बसवलेले सेल्फी पॉईंट तरुणांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. मतदान करून शाई लावलेले बोट दाखवत सेल्फी घेण्याचा मोह तरुणाईला आवरता आला नाही.
अहिल्यानगरच्या विकासाची चावी आता कोणाच्या हातात जाणार? बनावट ओळखपत्रांचा तपास काय लागणार? आणि मतदानाचा अंतिम टक्का किती राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



