Voting : श्रीरामपूर : श्रीरामपूर विधानसभा (Assembly) मतदारसंघात शिर्डी लोकसभेसाठी (Shirdi Lok Sabha Constituency) मोठी चुरस पाहायला मिळत आहे. मतदारांनी उत्स्फूर्तपणे सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. नवमतदार, युवक, युवती, वयोवृद्ध, महिला आणि पुरुष या सर्वांनी मतदानाचा (Voting) हक्क बजावला. श्रीरामपूर शहर व तालुक्यात दुपारी 3 पर्यंत 46.88 टक्के इतके मतदान झाले होते. दरम्यान, सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 60 ते 65 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत पाटील यांनी दिली आहे.
हे देखील वाचा: हवामान विभागाचा अलर्ट; जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस वादळी पाऊस
मतदारांचा मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद (Voting)
श्रीरामपूर शहरासह तालुक्यात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदारांचा मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी सकाळच्या सत्रात मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडल्याचे चित्र दिसत होते. तालुक्यातील टाकळीभान, खानापूर, मालवडगाव, दत्तनगर, खोकर, भोकर, पढेगाव, खंडाळा कारेगाव, कमलपूर, खैरी निमगाव, गोंडेगाव, बेलापूर यांसह ग्रामीण भागात मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या. ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावरील बुथवर मतदार आपली नावे शोधण्यासाठी गर्दी करताना दिसून येत होते.अनेक ठिकाणी मतदार अधिक आणि एकच बूथ असल्यामुळे मतदान करण्यासाठी गर्दी होत होत असल्याचे दिसून आले.
नक्की वाचा: आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
गोंधवणी येथे मतदान यंत्र बंद पडल्याने गोंधळ (Voting)
काही मतदान केंद्रावर मतदान यंत्रांसाठी पंखे बसवलेले नव्हते. गोंधवणी येथे मतदान केंद्रावर मतदान यंत्र बंद पडल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. नंतर अधिकाऱ्यांनी यंत्र बदलले. त्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरळीत झाली. उन्हाचा चटका जाणवत असल्याने अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. स्तनदा मातांसाठी पाळणा घराची व्यवस्था ठेवण्यात आली होती. तसेच वयोवृद्ध मतदारांना आरोग्यसेवा पुरवण्याच्या दृष्टीनेही तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. मतदारांना अडचण येऊ नये म्हणून मतदार सहायता केंद्रही ठिकठिकाणी स्थापन करण्यात आले होते. तालुक्यातील सर्वच ठिकाणच्या मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.