Voting : कर्जत : कर्जत-जामखेड मतदारसंघात मतदानाची (Voting) टक्केवारी वाढविण्यासाठी ५० टक्केपेक्षा कमी मतदान असलेल्या मतदान केंद्राच्या मतदारांमध्ये जनजागृती व्हावी, तसेच त्यांची उदासीनता दूर करून मतदानाचा हक्क बजवावा यासाठी गृहभेटीचे निर्देश सहायक निवडणूक अधिकारी (Assistant Election Officer) तथा कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले. कर्जत-जामखेड मतदारसंघातील एकूण १२६ मतदान केंद्र (Polling Station) सरासरी ५० टक्केपेक्षा कमी असून याठिकाणी हा प्रयोग दि १० आणि ११ मे रोजी राबविला जाणार आहे.
हे देखील वाचा : गरिबांचे आरक्षण हिसकावून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा घाट; पंतप्रधान माेदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबाेल
मतदान केंद्रांवर गृहभेटी देण्याचे निर्देश (Voting)
लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू असून देशात आणि राज्यात यंदा ऐन कडाक्याच्या उन्हात मतदान सुरू आहे. एकूण सात टप्प्यात होणारी लोकसभा निवडणूक कालच्या तिसऱ्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामध्ये देशातील अनेक भागात यासह महाराष्ट्र राज्यात देखील मतदानाची टक्केवारी २०१९ च्या तुलनेत फार कमी झाल्याची दिसून आली आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता सरासरी ५० टक्केपेक्षा कमी टक्के मतदान असलेल्या मतदान केंद्रांच्या क्षेत्रात घरोघरी भेटी देण्याचे निर्देश निवडणूक आयोगातर्फे देण्यात आले. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली ८ मे रोजी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या कक्षामध्ये मतदारांना मतदानाकरिता प्रोत्साहित करण्याबाबत नियोजन बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये ५० टक्केपेक्षा कमी मतदान असलेल्या मतदान केंद्राचा आढावा घेण्यात आला. यामध्ये कर्जत-जामखेडचे ३५६ मतदान केंद्रापैकी एकूण १२६ मतदान केंद्र निदर्शनास आले असून या सर्व मतदान केंद्रांवर गृहभेटी देण्याचे निर्देश प्रांताधिकारी पाटील यांनी दिले.
नक्की वाचा: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २० मे पर्यंत वाढ
राष्ट्रीय कर्तव्याविषयी जनजागृती (Voting)
या भागातील मतदारांना मतदान या राष्ट्रीय कर्तव्याविषयी जनजागृती करणे, मतदारांची उदासिनता दूर करून लोकशाहीत मतदान अधिकाराचे महत्त्व पटवून देणे तसेच आपल्या एका मताने देशाची लोकशाही मजबूत कशी होते याचे महत्व विशद करीत जास्तीत-जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी मतदारसंघासाठी समिती गठीत केल्या आहेत. यामध्ये ग्रामपंचायत – नगरपालिका कर्मचारी, अंगणवाडी सेविका – मदतनीस, आरोग्यसेविका व आशासेविका यांच्यासह ग्रामसेवक, पोलीस कर्मचारी आणि तलाठी यांचा समावेश आहे. या समितीच्या सदस्यांना निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार प्रशिक्षण देण्यात येणार असून तदनंतर दि १० आणि ११ मे रोजी (शुक्रवार आणि शनिवार) मतदारसंघातील ५० टक्केपेक्षा कमी मतदान केंद्रांमधील मतदारांच्या घरोघरी भेट देत मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी पाटील यांनी सांगितले. तसेच मतदानाच्या दिवशी संबंधित भागांमध्ये प्रत्यक्ष फिरून मतदान न केलेल्यांना मतदानासाठी जाण्यास प्रोत्साहित करावे, असे देखील बैठकीत ठरले आहे. या बैठकीसाठी कर्जत तहसीलदार गुरु बिराजदार, जामखेड तहसीलदार गणेश माळी, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, मुख्याधिकारी अजय साळवे, महिला व बालविकास अधिकारी प्रशांत मिटकरी आदी उपस्थित होते.