Warning : श्रीरामपूर: टाकळीभान हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे व परिसरातील खेड्यांचे दळणवळण येथूनच होत असल्याने या ठिकाणी बसथांब्यासाठी बस स्टँड (Bus Stand) आवश्यक आहे. मात्र, या ठिकाणी बसस्टॅंडच नसल्याने प्रवाशांना, महिलांना उन, वारा, पावसात रस्त्याच्या कडेलाच ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे येथील तरूणांनी सार्वजनीक बांधकाम विभागाकडे (Public Works Department) बस स्टॅंड व सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याबाबतचे निवेदन दिले असून या निवेदनातून रास्ता रोकोचा इशारा (Warning) देण्यात आला आहे.
नक्की वाचा: नगर-मनमाड रस्त्यावर पुन्हा अपघात; नागरिकांसह माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचे रास्ता रोको आंदोलन
या निवेदनात नमूद केले आहे की,
टाकळीभान हे गाव तालुक्यातील मोठे गाव आहे. या गावातून तसेच पंचक्रोशीतील अनेक गावातून ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थी शिक्षण, नोकरी तसेच इतर दैनंदिन कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जातात. स्टॅंडवर आल्यानंतर बस येईपर्यंत या प्रवाशांना तसेच विद्यार्थ्यांना बस स्टॅंड नसल्यामुळे रस्त्याच्या कडेलाच तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. या ठिकाणी बस स्टॅंड होते. मात्र रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली हे बस स्टॅंड रस्ता रुंदिकरणाला अडथळा ठरत नसतानाही पाडले गेले आहे. तसेच या ठिकाणी बस स्टॅंड साठी निधी मंजूर आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या चालढकलीमुळे ते होवू शकले नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
अवश्य वाचा: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढवणार: खासदार लंके
महिला व विद्यार्थीनींची प्रचंड हेळसांड (Warning)
टाकळीभानचा परिसर विस्तीर्ण असल्याने गावातील लोकसंख्या व विद्यार्थी संख्या प्रचंड वाढलेली आहे. रस्त्याच्या दुतर्फा हे विद्यार्थी बसची वाट पाहत उभे असतात. महिला व विद्यार्थीनींची यावेळी प्रचंड हेळसांड होत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर या ठिकाणी बस स्टॅंड व सुलभ शौचालय बांधावे, अन्यथा टाकळीभानचे संतप्त ग्रामस्थ व विद्यार्थी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर काकासाहेब कोकणे, सचिन माने, विकास पटारे, साईनाथ खंडागळे, भाऊसाहेब पवार, बद्रीनाथ पटारे आदींच्या सह्या आहेत.