Warning of Protest : श्रीरामपूर : गेल्या ३० वर्षांपासून अशोकनगर फाटा ते अशोकनगर रस्ता दुरुस्तीविना पडून असून प्रशासनाचे व लोकप्रतिनिधीच्या (People’s representatives) या रस्त्याबाबत असलेल्या उदासीनतेमुळे ग्रामस्थांनी अनेक आंदोलने, निवेदने, रस्ता रोको करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ निपाणी वडगाव – अशोकनगर व मातापूर येथील संतप्त ग्रामस्थांनी होळी सणाचे दिवशी १३ मार्च रोजी “सामूहिक मुंडण आंदोलन” करणार असल्याचा इशारा (Warning of Protest) सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियांता बापूसाहेब वराळे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
नक्की वाचा : ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 3 हजार रुपये वाढून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की,
अशोकनगर रस्ता हा वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. अनेकांना मणक्याचे आजार होत असून गर्भवती महिला, रुग्ण, विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा प्रचंड त्रास अनेक वर्षानुवर्ष सहन करावा लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून मागणी करूनही केवळ आश्वासनांची खैरात सुरू आहे, पण प्रत्यक्षात कामाचे फक्त आश्वासन मिळत असून खोट्या सहानुभूती दाखवून ग्रामस्थांच्या मूलभूत अधिकाराची गळचेपी केली जात आहे. सदरचा रस्ता अतिशय महत्त्वाचा आणि रहदारीचा असल्याने व मातब्बर राजकीय मंडळी माजी आमदार, सभापती, उपसभापती, विविध संस्थांचे पदाधिकारी व अनेक पक्षांचे राज्य पातळीवर आपल्या कामकाजाचा ठसा उमटवणारे लोकप्रतिनिधी इथे असतानाही सदरच्या रस्त्याचे तीस वर्षापासून साधे भूमिपूजनही होऊ शकलेले नाही ही मोठी खेदाची बाब असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
अवश्य वाचा : मढी ग्रामसभेतील ठरावाचे जिल्हाभर पडसाद
रस्त्याच्या कामाचा आराखडा फितिमध्ये अडकला (Warning of Protest)
याबाबत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला अंतिम अल्टिमेटम दिला असून १५ दिवसांत रस्त्याच्या कामाचा मंजूर आराखडा ज्या फितिमध्ये अडकला आहे, त्याची सखोल चौकशी होऊन रस्त्याच्या कामाची तात्काळ दुरुस्ती करावी व सदरच्या प्रस्तावास अंतिम मंजुरी घ्यावी अन्यथा होळी सणाचे दिवशी श्रीरामपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रवेशद्वारामध्येच “सामूहिक मुंडण आंदोलन” करून निषेध नोंदवला जाईल! सदरच्या सामूहिक मुंडण आंदोलनाचा इशारा भगतसिंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड श्रीकृष्ण बडाख, जय मल्हार सेनेचे तालुका अध्यक्ष संजय राऊत, भीमशक्तीचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव, भाजप ओबीसी मोर्चाचे उपजिल्हाध्यक्ष लखन लोखंडे, मा. विस्ताराधिकारी अशोकराव बोरुडे, मराठा कुणबी महासंघाचे दत्तात्रय जाधव, बी.जी. गायधने, प्रशांतराजे शिंदे, राजेंद्र राऊत, प्रवीणशेठ लोळगे, विजय जाधव, शरद दोंड, शरद डोळसे, बाळासाहेब मेटे, देविदास राऊत, जालिंदर उंडे, गणेश पवार, जालिंदर लोखंडे, डॅनियल पवार आदींनी दिला आहे.