Water Shortage : नगर : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमानात वाढ हाेत असल्याने बाष्पीभवनचे प्रमाणही वाढले आहे. दुसरीकडे पाणी वाटप धाेरणाचा फटका नगरमधील धरणांना बसला आहे. त्यामुळे नगर शहरासह मुळा धरणावरील (Mula Dam) पाणीपुरवठा योजनेचे २० टक्के पाणी कपात (Water Shortage) करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) घेतला आहे. त्यामुळे नगरकरांना आता पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे.
हे देखील वाचा: सुप्याच्या एमआयडीसीत खंडणी बहाद्दर गोळा झालेत – राधाकृष्ण विखे पाटील
पाणी साठ्यात कमालीची घट
वाढते ऊन, त्यामुळे वाढलेले बाष्पीभवन, जायकवाडी धरणात पाणी सोडल्याने कमी झालेला साठा, या सर्व बाजू लक्षात घेऊन जुलैपर्यंत पाणी उपलब्ध रहावे, म्हणून हे कपात धोरण आखले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी पावसाने हात आखडता घेतल्याने समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी धरणातील पाणी साठ्यात कमालीची घट झाली आहे. याबाबी लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने वेळीच खबरदारी घेतली आहे.
नक्की वाचा: लोकसभा निवडणुकीत माझा फोटो,नाव कुणीही वापरू नयेत-मनोज जरांगे
बिगर सिंचनासाठी पाणी राखून ठेवणार (Water Shortage)
मुळा धरणावर नगर शहर, नगर एमआयडीसी, सुपा एमआयडीसी, नगरमधील लष्करी तळ या मोठ्या योजनांसह विविध गावच्या पाणी योजना आहेत. धरणातील पाणीसाठा ४७ टक्क्यांवर आला आहे. साठा खालावल्याने सिंचनासाठी पाणी मिळणे आता जवळपास अशक्य आहे. मिळाले, तरी त्याचे आवर्तन कमी असेल. बिगर सिंचनासाठीचे पाणी राखून ठेवावे लागणार आहे. त्यात पाणी योजनांना प्राधान्य राहणार आहे. त्यामुळे सर्व पाणी योजनांचे वीस टक्के पाणी कपात करण्याचे धोरण पाटबंधारे विभागाने ठेवले आहे. तशा सूचना महापालिका, संबंधित नगरपालिका, ग्रामपंचायत यांना देण्यात आल्या आहेत.