Water Shortage : कर्जत: ये टँकर आला रे…… म्हणताच कर्जत शहरातील (Karjat city) महिलांसह पुरुष बांधव देखील हातातील कामे टाकून वापरण्यासाठी पाणी (Water) मिळेल का? ते पण विकतचे. मोफत नव्हे असे विनवणी करतानाचे चित्र मागील एक महिन्यापासून कर्जत शहर आणि उपनगरात पहावयास मिळत आहे. कर्जतचा पाणीप्रश्न मिटला आहे, असे वाटत होते. परंतु यंदा पुन्हा या भीषण पाणीटंचाईचा (Water Shortage) कर्जतकर सामना करताना दिसतात. अनेक भागात मागील १२ ते १३ दिवसांपासून नळाला पाणी आले नाही.
हे देखील वाचा: वकिलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी गजाआड
जलस्रोत कोरडे पडल्याने पाण्यासाठी वणवण (Water Shortage)
यंदा पावसाच्या अल्प प्रमाणाने सर्वत्र भीषण पाणीटंचाईची समस्या उदभवली आहे. जलस्रोत कोरडे पडल्याने सर्वसामान्य नागरिक पाण्यासाठी वणवण करताना दिसत आहे. कर्जत शहरासाठी २८ कोटींची नळयोजना कार्यान्वित झाली. पण त्या योजनेनेसुद्धा यंदा मान टाकली. भीमानदी खेड येथील नदीपात्र आटल्याने महिन्याभरापासून कर्जतकर निर्जलीचा सामना करीत आहे. त्यामुळे कर्जतकरांना पुन्हा एकदा खासगी विकतच्या पाण्यावर आपली गुजराण भागवावी लागते. मात्र, त्यास देखील विनवणी करावी लागते. खासगी टँकरवाल्यास पाण्याची मागणीसाठी सकाळी फोन केल्यास तो संध्याकाळी येतो. कधी-कधी तर दुसरा दिवस देखील उजडला जातो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पाण्यावाचून मोठा अडचणीचा सामना करावा लागतोय. शहरात किंवा उपनगरात शेजारी पाण्याचा टँकर आल्यास मुलांनी ये टँकर आला रे …. अशी आरोळी ठोकल्यावर महिलांसह पुरुष मंडळी देखील हातातील सर्व कामे तशीच टाकून त्यांच्या मागे धावत पाणी देण्याची विनवणी करताना चित्र पहावयास मिळत आहे. मागील पाच-सहा वर्षांपासून सुटलेली कर्जतकरांची सवय यावर्षी पुन्हा दिसून आली. तसेच टंचाईकाळात जे हातपंप आधार देत होते ते नादुरुस्त पडले. यासह घरगुती बोअरवेलला देखील पाणी नसल्यामुळे त्यांनी मान टाकल्याने कर्जतकरांची तहान खासगी टँकरवरच येऊन ठेपली आहे.
नक्की वाचा: भारतातील लोकशाही संकटात : पवार
ऐन निवडणुकीच्या काळात पाणीटंचाई (Water Shortage)
कर्जत शहरासाठी २३ हजार लोकसंख्येला प्रति माणसे ३० लिटरनुसार सुमारे ६ लाख ९० हजार लिटर पाण्याची आवश्यकता भासते. यासाठी पळसओढा येथून १० टँकरच्या २७ खेपा होत आहे. मात्र त्यांचे नियोजन करताना नगरपंचायत प्रशासनाला मर्यादा पडते. ऐन निवडणुकीच्या काळात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरीकांच्या रोषास प्रचारकर्त्यांना सामोरे जावे लागते. पाणी वाटप वेळापत्रक करून देखील त्याची पूर्तता होत नसल्याने स्थानिक नगरसेवकांना देखील नागरिक खडे बोल सुनावताना दिसते. कर्जत तालुक्यातील करपडी, टाकळी खंडेश्वरी, कापरेवाडी, डिकसळ, चांदे खुर्द, चांदे बुद्रक, थेटेवाडी, परीटवाडी, सोनाळवाडी, बहिरोबावाडी, नवसरवाडी, चिंचोली काळदात, कोंभळी, राशिन, पाटेगांव, मुळेवाडी, काळेवाडी, सुपे, वालवड, तरडगांव, सितपुर, आखोणी, दिघी, आनंदवाडी, खंडाळा, कौडाणे, खांडवी, गुरवपिंपी, येसवडी, निंबोडी, अळसुंदे, कानगुडवाडी, चापडगांव, रेहेकुरी, निमगांव डाकु, बाभुळगांव खालसा, दुरगांव, मिरजगांव आणि रवळगांव या ३९ गावांसाठी ३६ टँकर रस्त्यावर धावत आहेत.