Code Of Conduct:आचारसंहिता म्हणजे काय? वाचा,आचारसंहितेचे नियम

0
Code Of Conduct:आचारसंहिता म्हणजे काय? वाचा,आचारसंहितेचे नियम
Code Of Conduct:आचारसंहिता म्हणजे काय? वाचा,आचारसंहितेचे नियम

Code Of Conduct : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल (ता.१५) पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या निवडणुकांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात विधानसभा (Vidhasabha) निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ तारखेला मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे. निवडणूक आयोगानं विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच निवडणूक आचारसंहिता लागू केली आहे. आता आचारसंहिता (Code Of Conduct) काय असते?आचारसंहितेची गरज काय? यातील नियम काय सांगतात? हे जाणून घेऊयात.

नक्की वाचा : मोठी बातमी!स्टॅम्प पेपरच्या दरात पाच पट वाढ

आचारसंहिता म्हणजे काय ? (Code Of Conduct)

देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात,यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत. याच नियमांना आचारसंहिता म्हणतात. निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणे बंधनकारक आहे. एखाद्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षानं आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते. यातील काही नियम पाहुयात..

अवश्य वाचा : भाजपकडून लाडकी बहीण योजनेची जोरदार जाहिरात,मात्र मुख्यमंत्री शब्द वगळला

आचारसंहिता लागू झाल्यानंतरचे नियम (Code Of Conduct)

सत्तेत असणाऱ्या पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा,नवीन योजना सुरू करता येत नाही. शीलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन असे कार्यक्रमही घेता येत नाहीत.
सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई असते.
कुठल्याही पक्षाला प्रचारसभा,रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे गरजेचे असते.
कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जाती, पंथ याआधारे मतदारांना मत देण्याचं आवाहन करू शकत नाही.
जातीधर्मावरून तणाव निर्माण होईल,अशी कुठलीही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई आहे.
कुणाच्याही घरावर, जमिनीवर, कुणाच्याही घराच्या परिसरात, भिंतीवर देखील राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर, पत्रकं असं काही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानही घेणं आवश्यक आहे. विनापरवानगी प्रचार करण्याची अनुमती नसते.
मतदानाच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात. प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास मनाई असते.
मतदान केंद्राजवळ कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकांची गर्दी जमू नये,याची दक्षता घ्यावी असं आचारसंहिता सांगते.
मतदानाच्या दिवशी लागणारे पक्षांचे बूथ साधेपणानेच लावलेले असावेत. प्रचारसाहित्य किंवा मतदारांना भुलवणारी कुठलीही गोष्ट तिथे असता कामा नये. मतदारांसाठी कुठलीही खाण्यापिण्याची व्यवस्था तिथे नसावी.

आचारसंहितेच्या काळात मतदारांना पैसे देणं, त्यांना धमकी देऊन घाबरवणे, बोगस मतदान, मतदान केंद्रापासून १०० मीटरच्या आतल्या कक्षेत कुठल्याही पद्धतीने प्रचार करणं, प्रचाराचा अवधी संपल्यानंतरही प्रचार करत राहणं आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं किंवा परत आणणं, त्यांच्या जाण्या-येण्याची सोय करणं, वाहन मिळवून देणं यातलं काहीही करण्यास आचारसंहितेनुसार बंदी आहे.अशा पद्धतीने आचरसंहितेत काही नियम हे पाळावे लागतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here