नगर : दिवाळी संपली की आता सगळीकडे हुडहुडी भरवणारी गुलाबी थंडी (Pink cold) आपल्याला जाणवत आहे. अहिल्यानगरसह देशभरात सगळीकडेच थंडीची लाट सुरु झाल्याचे पाहायला मिळाले आहे. उन्हाळा आणि पावसाळ्यापेक्षा हिवाळा (Winter) हा ऋतू आपल्याला हवाहवासा वाटत असला तरी हा ऋतू अनेक आजारांना निमंत्रण देणारा ठरू शकतो. त्यामुळे हिवाळ्याचा आनंद लुटायचा असेल, तर तुम्ही ‘फिट’ देखील असायला हवं. चला तर मग जाणून घेऊयात हिवाळ्यात आरोग्याची काळजी (Winter Health Tips)कशी घ्यावी?
हिवाळा हा ऋतू खरंतर आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम मानला जातो.थंडीत आपल्याला भूक देखील प्रचंड लागते, त्यामुळे आहारही चांगला राहतो. तंदुरुस्त राहण्यासाठी हा ऋतू आहे. परंतु, थंडीत विषाणूजन्य आजार होण्याची शक्यताही अधिक असते. शहरात वाढलेली धूळ आणि हवेतील प्रदूषण नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंग दुखणे अशा तक्रारी डोके वर काढतात.
नक्की वाचा: लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आता मोठी कारवाई
काय काळजी घ्याल ? (Winter Health Tips)

थंडीत पौष्टिक आहार हवा. त्याचबरोबरच फळांचे सेवन करावे, सुकामेवा खाणे देखील आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. नियमित व्यायाम, मॉर्निंग वॉक निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. शीतपेय, शिळे पदार्थ, उघड्यावरचे खाणे टाळावे. या काळात शरीरातील जास्त ऊर्जा खर्च होत असल्याने भूक लागते. थंडीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा आहार सेवन करावा.
अवश्य वाचा: मै सत्यनिष्ठा से…बिहारच्या मुख्यमंत्रीपदी दहाव्यांदा नितीश कुमार
थंडीत ‘या’ महत्वाच्या गोष्टी कराव्यात (Winter Health Tips)
हिवाळ्यात भाज्या आणि फळे भरपूर प्रमाणात खावीत. फळे आणि भाज्यांमध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे हिवाळ्यात आजारांशी लढण्यासाठी प्रभावी ठरतात.
थंडीत शरीराला नैसर्गिक उष्णतेची गरज असते. म्हणून शेंगदाणे, गूळ, खजूर इत्यादी शरीरातील उष्णता टिकवून ठेवणारे पदार्थ खा.
विवाह आणि इतर कार्यक्रमात अन्न खाताना, अन्न गरम आणि ताजे असेल याची काळजी घ्या. अति थंड झालेल्या कोणत्याही गोष्टीचे सेवन करणे टाळावे.
थंडीत रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवावे. हिवाळ्यात मिठाचे सेवन कमी प्रमाणात करावे. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो.
हिवाळा तसा आरोग्यदायी ऋतू आहे. मात्र, थंडी, धुक्यामुळे लहान मुले आणि वृद्धांना श्वसनाचे विकार बळावण्याची शक्यता जास्त असते. उबदार कपड्यांच्या वापराबरोबर प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढवायला हवे.



