स्त्री,नारी, महिला, औरत, womens, बाई माणूस…… कधीही कुणास न समजलेली…न उमगलेली…आणि न जाणवलेली.
बुद्धीने विचार केला तर कधीच न समजणार एक व्यक्तिमत्व पण…… प्रेमाने विचार केला तर एक साधं सरळ अस्तित्व.
Women’s Day : आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women’s Day) 8 मार्च च का?…. स्त्री जागर म्हणजे काय?.. स्त्री सक्षमीकरण म्हणजे काय?… या आणि यासारखे अनेक प्रश्न मला नेहमी पडतात. आंतरराष्ट्रीय महिला दिन (Women’s Day) केवळ एक दिवस साजरा केल्याने महिलांची दैनंदिन स्थिती सुधारणार आहे का हो. मी तर म्हणेल की दररोज त्यांचा आदर करणे गरजेचे आहे. असा एक दिवस म्हटला की मला बैलपोळा आठवतो. एक दिवस शेतात त्याला राबवत नाही. सजवले -धजवले जाते. पाठीवर झूल टाकले जाते. गळ्यात घुंगुरमाळा घातल्या जातात. पुरणपोळीचा नैवेद्य, पण नंतर…….. वर्षभर काय? तेच शेत आणि त्याच शेतात राबण्याशिवाय बिचाऱ्याला पर्याय नाही. तशीच काहीशी अवस्था आमच्या महिला भगिनींची आहे. एक दिवस तो काय सेलिब्रेशनचा. सकाळपासून सोशल मीडियाद्वारे अनेक महिला भगिनीं एकमेकींना वुमन्स डे च्या शुभेच्छा देतात. पण खरच असतो का हो महिला दिन ती नुसती औपचारिकता.
अवश्य वाचा : भारत-न्युझीलँड यांच्यात होणार अंतिम सामना; दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव
महिला दिनाच्या समारंभा नंतर…
विशेष करून किंवा प्रकर्षाने जाणवते की महिला दिनानिमित्त अनेक संस्था, शाळा, ऑफिसेस कॉलेजमध्ये कर्तबगार, करारी, उच्चपदस्थ अधिकारी त्या- त्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिलांना बोलावले जाते. राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाई, लक्ष्मीबाई पाटील, साने गुरुजींच्या आई यशोदाबाई, यासारख्या दिग्गज महिलांची नावे वकृत्वामध्ये घेतली जातात आणि तमाम प्रेक्षकांमधील महिला भगिनींना खरोखरच स्वतःविषयी एक सार्थ अभिमान वाटायला लागतो, उर भरून येतो. की आपण खरोखरच एक वेगळं अस्तित्व आहोत. आणि महिला दिनाच्या समारंभा नंतर घरी आल्यावर येरे माझ्या मागल्या….. कामाच्या ओघामध्ये सगळ्याचाच विसर पडून जातो.
नक्की वाचा : स्वारगेट अत्याचार प्रकरण;आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांच्या गणवेशातील फोटो आला समोर
महिला दिनाच्या लेखांमध्ये ठरलेली काही वाक्य (Women’s Day)
“यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता ” याचा अर्थ काय ज्या घरामध्ये ज्या संस्कृतीमध्ये स्त्रीची पूजा केली जाते तिथे लक्ष्मी वास करते. पण परिस्थिती मात्र या उलट आहे जी माप ओलांडून येताना भरमसाठ लक्ष्मी घेऊन येते तिची पूजा केली जाते.
” संसार रथाची दोन चाके आहेत.(पुरुष आणि स्त्री ) मान्य.. पण रथाची चाके बरोबरीने चालतात, इथे मात्र भारतात पुरुष प्रधान संस्कृती रथाच्या ऐवजी सायकलची चाके म्हणावी लागतील. पुढचे चाक म्हणजे पुरुष मागचे चाक म्हणजे स्त्री. आता गंमत पहा सायकलचा ब्रेक पुढच्या व्यक्तीच्या हातात पुढच्या व्यक्तीला वाटलं की आता वळायचं. आता थांबायचं सगळे निर्णय तो घेणार. आणि ओझं मात्र मागच्या चाकावर कुलूप लावलं जातं ते मागच्या चाकाला. आहे की नाही वास्तविकता.
महिलांची स्थिती पहिल्यापासूनच योग्य असती तर आज कदाचित आपल्याला असे महिला दिवस साजरे करावे लागलेच नसते. ही परिस्थिती केवळ भारतात आहे असं नाही तर इतर विकसित राष्ट्रांमध्ये देखील महिलांची हीच स्थिती पाहायला मिळते. अजूनही काही देशांमध्ये स्त्रिया या निरक्षर आहेत, कुपोषित आहेत आणि दैनंदिन कौटुंबिक हिंसाचाराने त्रस्त आहेत. सक्षमीकरणानंतर कायद्यांमध्ये,हक्कांमध्ये महिलांच्या दृष्टीने सुधारणा झाल्या असतील,बदल झाले असतील परंतु महिलांची स्थिती ही पूर्णतः बदललेली नाही. ‘चूल आणि मुल ‘ ‘सातच्या आत घरात ‘आजही तिची तारेवरची कसरत चालूच आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये नवरात्रीला मुलींची,स्त्रियांची पूजा करण्याची प्रथा आहे.परंतु खऱ्या अर्थाने आपण स्त्रीला सन्मान देत आहोत का? सुरक्षिततेच्या दृष्टीने मुली रात्री उशिरापर्यंत ऑफिस वर्क करू शकतात का? रस्त्याने रात्री -अपरात्री येताना आई -वडीलांच्या काळजाचा ठोका आजही चुकतो आहे. कोपर्डी -निर्भया प्रकरण असेल किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलींची अवस्था, वर्तमानपत्रातील रोजचे स्त्रीच्या, मुलींच्या विषयीचे अत्याचार,हिंसाचाराचे मथळे अंगावर शहारे उभे करतात. आणि आत्ताचे ज्वलंत पुणे स्वारगेट शिवशाही बस प्रकरण. असे काही ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर भारत देश आजही विचाराने मागासलेला वाटतो. एका स्त्रीचे सुंदर असण्यापेक्षा आत्मनिर्भय असणं जास्त महत्त्वाचं असतं. सुंदरता ही जास्त दिवस टिकत नाही आणि आयुष्यभर पोसतही नाही, स्त्रीने आपला आत्म सन्मान आणि अस्तित्व टिकवून ठेवलं पाहिजे.
स्त्री अभिमान काय असतो?
स्त्रीला पाहताना तिचे मन वाचायला शिका.
तिची सुंदरता पाहताना तिच्यातील निर्मळपणा शोधा.
तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा असेल तर…
लादलेल्या बंधनातून तिला मुक्त करून पहा.
आज कोणतेही असे क्षेत्र नाही की जिथे महिला आघाडीवर नाहीत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ठाम निर्धाराने उभी आहे. आज घरातील प्रत्येकाचे कर्तव्य, जबाबदारी आहे की स्त्रीने तिच्या गमावलेल्या आत्मसन्मानाला,तिच्या अभिव्यक्तीला नव्याने फुलण्याची संधी दिली पाहिजे.
पुराणांमध्ये,कथांमध्ये स्त्रीला शक्तीचे स्वरूप मानले आहे . स्वतःच्या कर्तुत्वावर गगन भरारी घेणारी, दुर्दम्य आशावाद आणि परिस्थितीशी झुंजणारी नारी तुला मानाचा मुजरा.
तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार.
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा सुखी संसार.
कर्तुत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नवी झालर.
पुन्हा एकदा होऊ दे स्त्री शक्तीचा जागर.!!!
- पल्लवी महाडिक – चौधरी
संशोधक विद्यार्थी