
World Bodybuilding Championship : नगर : इंडोनेशिया येथे नुकत्याच झालेल्या १६व्या वर्ल्ड बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप (World Bodybuilding Championship) २०२५ मध्ये मेन्स स्पोर्ट्स फिजिक श्रेणीत भारताचा संदेश संजय देशमुख (Sandesh Sanjay Deshmukh) याने विजयी शिरपेचात सुवर्णतुरा रोवला. देशाचे नाव अभिमानाने जगभर झळकवणाऱ्या या यशस्वी खेळाडूचा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी खास सत्कार करत हार्दिक अभिनंदन केले.
नक्की वाचा : टीईटी सक्ती रद्द करा; शिक्षक संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
या वेळी अजितदादा पवार म्हणाले,
संदेशसारख्या जागतिक पातळीवरील खेळाडूंच्या यशामागे त्यांची निष्ठा, शिस्त आणि कठोर परिश्रम तर असतातच; परंतु योग्य मार्गदर्शन व वैज्ञानिक आहारयोजनाही तितकीच महत्त्वाची भूमिका बजावते. सुवर्णपदकाची कामगिरी ही केवळ वैयक्तिक विजय नसून महाराष्ट्राचा मान अधिक उंचावणारी आहे.
अवश्य वाचा : गावठी कट्टा बाळगणारे दोघे जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई
आहारतज्ज्ञ सौरभ बल्लाळ हे देखील उपस्थित (World Bodybuilding Championship)
सत्कार सोहळ्यात संदेश देशमुख यांचे आहारतज्ज्ञ आणि अहिल्यानगरचे सुपुत्र सौरभ बल्लाळ हेदेखील उपस्थित होते. उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये संतुलित आहाराचे महत्त्व अधोरेखित करत अजितदादांनी बल्लाळ यांच्या कौशल्याचे विशेष कौतुक केले. त्यांनी म्हटले, “सौरभ बल्लाळ यांचे काम अत्यंत उल्लेखनीय आहे. जागतिक दर्जाच्या खेळाडूंच्या यशात शास्त्रीय आहाराचा मोठा वाटा असतो आणि त्यांनी बजावलेली भूमिका प्रेरणादायी आहे.
या स्पर्धेच्या तयारीदरम्यान संदेश देशमुख याला इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनकडून अध्यक्ष स्वामी रमेश, सचिव चेतन पठारे तसेच शरद मारणे यांचे मार्गदर्शन व संयोग लाभला, ज्यामुळे त्याच्या प्रदर्शनात अधिक परिपूर्णता आली.
इंडोनेशियात पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जगभरातील अव्वल दर्जाचे खेळाडू सहभागी झाले होते. या कठीण स्पर्धेत संदेश देशमुखने सादर केलेली कामगिरी सर्वांच्या दृष्टीने उल्लेखनीय ठरली. शारीरिक बांधणी, फिटनेस, पोझिंग आणि स्टेज प्रेझेंटेशन या सर्व घटकांत त्याने उत्कृष्टता दाखवत सुवर्णपदकावर नाव कोरले.
सत्कारानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना संदेश देशमुख म्हणाले की, “हे यश माझ्यासाठी अभिमानाचे आहे. महाराष्ट्र सरकारकडून मिळणारा उत्साहवर्धक पाठिंबा आणि माझ्या टीमचे अविरत मार्गदर्शन मला पुढील स्पर्धांसाठी अधिक बळ देते.” अजितदादा पवार यांनी दोन्ही विजेत्या युवांची पाठीवर थाप देत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा देणारे हे व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले.


