Yashwant Dange : नगर : महापालिकेने (AMC) बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. माणिक चौक परिसरात रस्त्यावर व्यवसाय थाटणाऱ्या अतिक्रमणधारकांचे साहित्य जप्त करून त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड आकारण्यात आला. अतिक्रमण हटाव मोहीम (Anti-Encroachment Campaign) सुरूच राहणार असल्याचेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी सांगितले. तसेच जप्त केलेले साहित्य परत मिळणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अवश्य वाचा : जिल्ह्यात तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी
बाजारपेठेसह संपूर्ण शहरात अतिक्रमणांवर कारवाईचे नियोजन
बाजारपेठेसह संपूर्ण शहरात महापालिकेने अतिक्रमणांवर कारवाईचे नियोजन केले आहे. मंगळवारी दिवसभरात केलेल्या कारवाईत अनेकांचे साहित्य जप्त करण्यात आले. भिंगारवाला चौक ते तेलीखुंट चौक या ठिकाणी रस्त्यावर उभ्या असलेल्या २० पेक्षा जास्त विक्रेत्यांचे साहित्य, कपड्याचे गठ्ठे, जाहिरात फलक, दुकानांसमोरील लोखंडी जाळ्या जप्त करण्यात आल्या. शहाजी रोडवरील सारडा गल्ली कॉर्नर ते पोखरणा ज्वेलर्स पर्यंत रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ४० ते ५० हातगाड्यावर कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले.
नक्की वाचा : जूनपासून देशातील शिक्षण पद्धतीत ‘हे’ होणार बदल
५० पेक्षा जास्त हातगाडीधारकांवर कारवाई (Yashwant Dange)
तसेच, सारडा गल्ली ते मोहन ट्रंक डेपोपर्यंत रस्त्यावर १५ व्यवसायिक, दुकानदारांनी लोखंडी स्टूल, टेबल व जाळ्या टाकून अतिक्रमण केले होते. त्यांचे सर्व साहित्य जप्त करण्यात आले. मोची गल्ली, गंज बाजार व सराफ बाजारांमधील ५० पेक्षा जास्त हातगाडीधारक, पथविक्रेते यांचे साहित्य, टेबल, ताडपत्री, बांबू, जाहिरात फलक, गाड्या जप्त करण्यात आल्या. गुरुवारीही या भागात पथक गस्त घालत होते. त्यानंतर पथकाने माणिक चौक परिसरात मोर्चा वळवला. तेथे रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या व्यावसायिक, विक्रेत्यांवर कारवाई करून दोन हजार रुपये दंड करण्यात आला.