Yashwant Dange : नगर : महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Election) अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे. आता राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) आदेशानुसार मतदार यादीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. १ जुलै २०२५ या तारखेची शहर विधानसभा मतदारसंघाची यादी गृहीत धरली जाणार असून, त्याचे १७ प्रभागात विभाजन केले जाणार आहे. कर्मचाऱ्यांनी यादीचे विभाजन करताना हद्दीबाहेरील मतदारांचा समावेश होणार नाही याची दक्षता घ्यावी व यादीची पडताळणी करावी, अशा सूचना आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
नक्की वाचा : महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेतील एक हरकत अंशतः मान्य; आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती
६ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ६ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचे काम महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी आयुक्त डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. शहर विधानसभेच्या मतदार यादीतून भिंगार व बुरुडगाव येथील मतदार वगळून महापालिका हद्दीची यादी स्वतंत्र करावी. त्याचे १७ प्रभागानुसार विभाजन करावे. शहराच्या हद्दीबाहेरील मतदारांचा समावेश होणार नाही याची दक्षता घ्यावी. मतदारांची संख्या आणि महापालिकेसाठी तयार केलेल्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीतील मतदारांची एकूण संख्या समान असणे आवश्यक आहे. याची खात्री करावी, असे त्यांनी सांगितले.
अवश्य वाचा : कर्मचारी महिलेला ५० हजारांचा गंडा; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
मतदारांच्या ओळखीचे पुरावे तपासावे (Yashwant Dange)
तसेच, मतदार यादीतील दुबार नावांबाबत, मयत अथवा स्थलांतरित मतदारांच्या बाबतीत आयोगाच्या आदेशानुसार विशिष्ट चिन्हे करुन अशा मतदारांच्या ओळखीचे पुरावे तपासण्यासाठी केंद्राध्यक्षांना कळवण्यात यावे. विधानसभेसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नाव वगळणे, नावातील दुरुस्ती व पत्त्यामधील दुरुस्ती करणे इत्यादीबाबतची कार्यवाही करण्यात येणार नाही, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे स्पष्ट केले आहे.



