Yoga competition : संगमनेर : येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये पार पडलेल्या पाचव्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत (Yoga competition) 17 सुवर्णसह 32 पदकांची लयलूट करीत नगरच्या संघाने सब ज्युनिअर आणि ज्युनिअर अशा दोन्ही गटांच्या चॅम्पियनशिपचा (Championship) किताब पटकावला. संपूर्ण स्पर्धेवर प्रभुत्व गाजवणार्या नगर संघाने मुला-मुलींच्या दोन्ही गटात योगासनांचे उत्कृष्ट सादरीकरण करताना सुवर्णपदकांची (Gold Medal) कमाई केली. दमदार खेळाच्या जोरावर दोन गटात तिसरेस्थान मिळवणार्या नागपूरच्या (Nagpur) संघाने सिनिअर गटातील दोन्ही सुवर्णपदकं मिळवताना विजेतेपद पटकावले. या संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणार्या तीनही गटातील अव्वल सहा खेळाडूंचा विशेष सन्मानही यावेळी करण्यात आला.
नक्की वाचा: लाडक्या बहिणींना सन्मानाने त्यांचा हक्क दिला जात आहे : गोऱ्हे
विविध गटात मिळविली पदके
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट् असोसिएशन व बृहंमहाराष्ट्र योग परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ध्रुव ग्लोबल स्कूलच्या कॅम्पसमध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. मुला-मुलींच्या स्वतंत्र दोन गटात आणि योगासनांच्या चार प्रकारांमध्ये झालेल्या या स्पर्धेत सबज्युनिअर गटातील पारंपरिक प्रकारात पुण्याच्या नीरल वाडेकर व पालघरच्या विदीश राऊत यांनी सुवर्णपदकं मिळवले. नगरच्या तृप्ती डोंगरे व अंश मयेकर यांना रौप्य तर, वैदेही मयेकर आणि रोहन तायडे यांना कांस्य पदकांवर समाधान मानावे लागले. कलात्मक एकेरी प्रकारात नगरच्या अंश मयेकरसह पुण्याच्या नीरल वाडेकरला सुवर्णपदकं मिळाले. नगरच्या तृप्ती डोंगरे व रोहन तायडे यांना रौप्य आणि नागपूरच्या तेजस्वीनी खिंची व मुंबईच्या स्वराज फिसके यांनी कांस्यपदकं पटकावले.
अवश्य वाचा: बदलापूरच्या आंदोलनात लाडकी बहीण योजनेच्या विरोधात पोस्टर्स आले कसे?;मुख्यमंत्र्यांचा सवाल
राज्यभरातील स्पर्धकांचा सहभाग (Yoga competition)
कलात्मक योगासनांच्या दुहेरी प्रकारात नगरच्या अंश मयेकरने रोहन तायडेसह तर, पुण्याच्या नीरल वाडेकरने गार्गी भटसह सुवर्ण पदकांची कमाई केली. नगरच्या वैदेही मयेकर व रिद्धी लगड आणि नागपूरच्या खूश इंगोले व यज्ञेश वानखेडे यांनी रौप्य, तेजस्वीनी खिंची व निसर्गा भगत आणि मुंबईच्या स्वराज फिसके व हर्ष गोरीवले यांनी कांस्य पदकं मिळवले. तालात्मक योगासनांच्या दुहेरी प्रकारातही पुण्याच्या नीरल वाडेकर व गार्गी भट आणि नगरच्या रोहन तायडे व अंश मयेकर यांच्या जोडीने सुवर्णपदक मिळवत कमाल केली. तर, नगरच्या तृप्ती डोंगरे व देवांशी वाकळे आणि नागपूरच्या यज्ञेश वानखेडे व खूश इंगोले यांच्या जोडीला रौप्य आणि नागपूरच्या तेजस्वीनी खिंची व आर्या इंगोले, मुंबईच्या स्वराज फिसके व हर्ष गोरीवले यांच्या जोडीला कांस्य पदकाची कमाई झाली.
सब ज्युनिअर गटाप्रमाणेच ज्युनिअर गटातील स्पर्धेतही वर्चस्व राखताना नगरच्या प्रणव साहु व आर्यन खरात आणि रुद्राक्षी भावे व प्रांजल व्हन्ना यांच्या जोडीने तालात्मक दुहेरीचे सुवर्णपदकं मिळवले. ठाण्याच्या पार्थ कदम व निबोध पाटील आणि सोलापूरच्या जान्हवी चंदनशिवे व प्रांजली शिंदे यांच्या जोडीने रौप्य, नागपूरच्या ओम चौधरी व पार्थ दायमवार आणि नागपूरच्या मृणाली बाणाईत व श्रावणी राखुंडे यांनी कांस्य पदके प्राप्त केली. सिनिअर गटात मात्र नागपूरच्या खेळाडूंनी मुसंडी घेताना वैभव देशमुख, प्रणव कांगले व सुहानी गिरीपूंजे, रचना अंबूलकर यांच्या जोडीने तालात्मक दुहेरीचे सुवर्णपदकं प्राप्त केले. कोल्हापूरच्या ओम वरदाई, मनन कासलीवाल व तन्वी रेडिज्, प्रगती खरात यांच्या जोडीने रौप्य, ठाण्याच्या विकास तरे, गौतम गद्दे आणि रत्नागिरीच्या पूर्वा व प्राप्ती या सख्ख्या बहिणींच्या जोडीने कांस्य पदकांची कमाई केली.
या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत 17 सुवर्ण, अकरा रौप्य व चार कांस्य पदकांसह 32 पदकांची कमाई करणार्या नगरच्या संघाला सबज्युनिअर आणि ज्युनिअर गटाच्या चॅम्पियनशिपचा किताब देवून गौरवण्यात आले. पुण्याचा संघ दुसर्यास्थानी तर, नागपूरचा संघ तिसर्यास्थानी राहीला. सिनिअर गटातील विजेतेपदाचा बहुमान नागपूरच्या संघाला मिळाला, पुण्याला दुसरे तर, रत्नागिरीला तिसरे स्थान मिळाले. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट् असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, सेक्रेटरी राजेश पवार, कोषाध्यक्ष कुलदीप कागडे, तांत्रिक संचालक सतीष मोहगांवकर व स्पर्धा व्यवस्थापक महेश कुंभार यांच्या उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना पारितोषकांचे वितरण करण्यात आले. योगासनांचा खेळांमध्ये समावेश झाल्यापासून पार पडलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये देदीप्यमान कामगिरी करणार्या नगर संघातील सबज्युनिअर गटात अंश मयेकर, ज्युनिअर गटात आर्यन खरात व रुद्राक्षी भावे, मुलींच्या सबज्युनिअर प्रकारात पुण्याच्या नीरल वाडेकर व सिनिअर गटात नागपूरच्या वैभव देशमुख व सुहानी शिरपूंजे यांनी सर्वोत्कृष्ट योगासनांचे प्रदर्शन केल्याने आयोजकांच्या वतीने या सहा खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला.