Youth Literature and Drama Conference : नगर : आत्ताच्या युवा पिढीने अस्तित्वासाठी संघर्ष करत सर्व स्थित्यंतर पाहिली आहेत. भारताच्या लोकसंख्येतील सर्वाधिक भार तरुणाईचा आहे. या तरुणाईच्या ताकदीवरच भारत महासत्ता होणार आहे. त्यामुळे त्यांच्या भावनांचा विस्फोट होणार नाही याची काळजी घेऊन त्यांच्या भविष्याचा विचार होणे आवश्यक आहे. साहित्य व कला (Literature and Art) हे सामर्थ्य निर्माण करत जातीपातीचे भिंती दूर करत माणसं जोडत आहेत. या साहित्य व कलेकडे तरुणांना वळवणे हा उद्देश या युवा साहित्य व नाट्यसंमेलना (Youth Literature and Drama Conference) मागचा आहे. जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात गेलात तरी पुस्तकांनी दिलेले पंख उपयोगी येतील. तुम्हाला संघर्ष अटळ आहे पण संघर्षाच्या व अस्तित्वाच्या नादात जगणं हरवू नका. आभासी जगात जगू नका, तंत्रज्ञानाच्या जगात माणूसपण हरवू नका, पुस्तकाला आपला सर्वात प्रिय मित्र मानून जवळ करा, असा सल्ला अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे (Akhil Bhartiya Marathi Sahitya Mahamandal) अध्यक्ष मिलिंद जोशी (Milind Joshi) यांनी उपस्थित युवकांना देऊन म्हणाले, जयंत येलूलकर यांनी उत्कृष्ट नियोजनबद्धपणे हे संमेलनाचे यशस्वी आयोजन करून हा मराठीचा समृद्ध वारसा जपला आहे, असे सांगितले.
नक्की वाचा: आईने कचरा टाकायला सांगितल्याने मुलगा गेला घर सोडून
मिलिंद जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा व न्यू आर्ट्स कॉमर्स महाविद्यालय संयुक्त विद्यमाने होत असलेल्या राज्यस्तरीय युवा साहित्य व नाट्यसंमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा प्रसिद्ध अभिनेत्री गौरी देशपांडे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. प्रशांत भालेराव, आमदार संग्राम जगताप, साहित्य मंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे राज्य ग्रंथालयाचे संचालक अशोक गाडेकर, जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सचिव ॲड.विश्वासराव आठरे, सहसचिव मुकेश मुळे, सिताराम खिलारी, जयंत वाघ, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, माजी उपमहापौर गणेश भोसले, संमेलनाचे निमंत्रक जयंत येलुलकर, जेष्ठ कवी चंद्रकांत पालवे, डॉ सुधा कांकरिया व न्यू आर्ट्स कॉमर्स चे प्राचार्य बाळासाहेब सागडे आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक, साहित्यिक, कवी, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
अवश्य वाचा: १२७ कोटीची कामे अहिल्यानगर महापालिका करतेय उध्वस्त’
गौरी देशपांडे म्हणाल्या, (Youth Literature and Drama Conference)
युवकांचे साहित्य संमेलन अहिल्यानगरमध्ये होणे हे खरोखर औचित्यपूर्ण आहे. युवा ही समाजामध्ये विधायक बदल घडवून आणणारी शक्ती आहे. ही शक्ती वास्तव्या पासून दूर जात जीवघेण्या स्पर्धेत स्वत:ला हरवून बसली आहे. त्यामुळे आयुष्यात हरलो असे मानून नैरयाश्यात जात आहे. बंद पाडलेल विचार चक्र पुन्हा सुरु करण्याचे बळ साहित्य, नाट्य व कलेत आहे. म्हणून या जीवघेण्या स्पर्धेत एखादा छंद व कला जोपासा. आपल्या माय मराठीला जागवण्याचे व फुलवण्याचे काम तरुण पिढीकडे आहे. मराठी शाळा, मराठी साहित्य, मराठी नाटक यांना जपण्यासाठी आपण जाणीवपूर्वक काम केले पाहिजे.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, येणारी नवी पिढी घडण्यासाठी असे साहित्य संमेलन होणे आवश्यक आहे. नगरच्या भूमीने साहित्य व कलाक्षेत्रात अनेक दिग्गज व्यक्तिमत्व दिले आहेत. सोशल मीडियाच्या महाकाय वृक्षाने पृथ्वीला वेढा घातला आहे. यापासून मुक्त होण्यासाठी साहित्य व कला जोपासणे हा एकमेव चांगला पर्याय आहे. अहिल्यानगर मध्ये जयंत येरुलकरांसारखे अनेक दर्दी व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे पुढील साहित्य संमेलन नगरला द्यावे ते नक्कीच यशस्वी करण्यासाठी सर्व चळवळीतील कार्यकर्ते प्रयत्न करतील.
स्वागत अध्यक्ष डॉ.प्रशांत भालेराव म्हणाले, आजचे युग तरुण पिढीचे आहे. मात्र पूर्ण जगामध्ये ही पिढी गोंधळलेली व मानसिक स्थिती खराब झालेली आहे. त्यामुळे अविवेकी वृत्तीने ही पिढी वागू लागली आहे. त्यामुळे तरुण पिढीने वाचण्यासाठी जास्तीत जास्त साहित्याला व कलेला जवळ करून आत्मसात करावे. तरच तुमचे प्रश्न सुटतील. साहित्य संमेलना सारखे उपक्रम हे तरुणांना वेगळे वळण व दिशा देणारे व्यासपीठ ठरेल.
सुनिता पवार म्हणाल्या, अहिल्यानगर मध्ये झालेले युवा साहित्य व नाट्य संमेलचे उत्कृष्ट नियोजित केले आहे की हे मिनी अखिल भारतीय साहित्य संमेलनच वाटत आहे. आगामी १०१ वे साहित्य संमेलन नगर मध्ये होण्याची केलेली मागणी विचरार्ह आहे.
यावेळी विश्वासराव आठवे यांनी जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचा १०५ वर्षाचा वैभवशाली इतिहास थोडक्यात व्यक्त केला. प्रस्ताविकात जयंत येलुलकर यांनी साहित्य संमेलना आयोजनाच्या मागची भूमिका विशद करून येणारे १०१ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नगरला द्यावे अशी मागणी केली. ही मागणी महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनीही आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
यावेळी नाट्य व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. प्रा.प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य बाळासाहेब सागडे यांनी आभार मानले. पसायदानाने उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली.