Zika Virus in Pandharpur : विठ्ठलाच्या पंढरीत झिका व्हायरसचा शिरकाव

पुण्यानंतर आता पंढरपुरात झिका व्हायरसचा संशयित रुग्ण आढळून आला आहे.

0

नगर : कोरोनानंतर देशात आणखी एका आजारानं डोकं वर काढलं आहे. भारतात आता झिका व्हायरसचा (Zika Virus) शिरकाव झाला आहे. पुण्यानंतर आता पंढरपुरात (Pandharpur) झिका व्हायरसचा संशयित रुग्ण आढळून आला आहे. ऐन कार्तिकी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर शहरात झिका व्हायरसचा संशयित रुग्ण आढळून आल्याने भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

नक्की पहा : ‘मराठा नेत्यांचा पाठिंबा मिळाला तर दोन तासांत आरक्षण मिळेल’ – जरांगे

मुंबईवरून एक महिन्यापूर्वी आलेल्या डॉक्टरला पंढरपूरमध्ये पोहचल्यावर त्रास जाणवू लागला आहे. त्यांना पुणे येथे जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची झिका व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांची तब्येत आता चांगली असून पंढरपूरमध्ये सगळीकडे तपासणी सुरू करण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत एकही झिका व्हायरस रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे यात्रेच्या तोंडावर भाविकांनी चिंता करण्याचे काम नसल्याचे सांगण्यात आले आहे. येत्या २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. यात्रेसाठी राज्यासह परराज्यातून सुमारे सात ते आठ लाख भाविक येतील असा अंदाज आहे.

अवश्य वाचा : विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबाबत सुपरस्टार रजनीकांत यांची भविष्यवाणी

डेंग्यू आजारात जी लक्षणे दिसून‌ येतात तशीच झिका व्हायरसच्या आजाराची लक्षण आहेत. झिका व्हायरस हा जीवघेणा आजार असल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. ताप येणं, डोकंदुखी आणि मळमळणे अशी‌ झिका आजाराची प्राथमिक लक्षणं दिसून येतात. प्रामुख्याने डासांच्या मार्फत हा आजार पसरतो. त्यामुळे जिल्हा हिवताप विभागाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परिसरात धूळ फवारणी सुरू केली. या शिवाय लोकांमध्ये या आजाराविषयी जनजागृती केली जात आहे. पंढरपूर शहरातील मठ, मंदिरे, धर्मशाळा या ठिकाणी विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा हिवताप विभागाने केले आहे.