Zilla Parishad School :पारनेर: सुमधुर गाणी, नयनरम्य नृत्य, ऐतिहासिक आणि विनोदी नाटके… त्याला साजेसा दर्जेदार अभिनय आणि दिलखेचक अदा! अशा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाने पळवे खुर्द (ता. पारनेर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या (Zilla Parishad School) विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. निमित्त होते शाळेच्या स्नेहसंमेलनाचे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पळवे खुर्द परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक उपस्थित होते. तसेच पंचक्रोशीतील शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने सोहळ्याची शोभा अधिकच वाढली.
अवश्य वाचा- श्रीगोंदा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात
विनोदी नाटकांमुळे प्रेक्षकांमध्ये हास्याचे कारंजे (Zilla Parishad School)
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस कलाकृती सादर केल्या. ऐतिहासिक नाटकांतून पराक्रमाचा इतिहास जिवंत केला, तर विनोदी नाटकांमुळे प्रेक्षकांमध्ये हास्याचे कारंजे उडाले. नृत्याविष्कारातून विद्यार्थ्यांनी आपली लवचिकता आणि तालबद्धता सिद्ध केली. अतिशय खुमासदार सूत्रसंचालनाने या संपूर्ण सोहळ्यात अधिकच रंग भरला, ज्यामुळे प्रेक्षक शेवटपर्यंत कार्यक्रमाशी खिळून राहिले. नियोजनबद्ध आयोजन आणि सहकार्य पारनेरचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका अनुराधा कोतकर व शिक्षिका मनिषा रोकडे यांनी या स्नेहसंमेलनाचे नेटके नियोजन केले होते. या कार्यात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांची त्यांना खंबीर साथ मिळाली.
नक्की वाचा- अमेरिकेकडून भारताला रशियन कच्चे तेल खरेदी करण्याची सूट; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
पालक व ग्रामस्थांचे कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य (Zilla Parishad School)
गावातील सर्व दूध संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी सैनिक परिवार, सर्व गणेश तरुण मंडळाचे सदस्य, तसेच सर्व पालक व ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले. अतिशय शिस्तबद्ध आयोजन आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना मिळालेली संधी, यामुळे या स्नेहसंमेलनाचे पळवे खुर्दसह संपूर्ण पंचक्रोशीत कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना अशा व्यासपीठामुळे मोठी चालना मिळत असल्याची भावना पालकांनी यावेळी व्यक्त केली.



