Shri Datta Devasthan : नगर : येथील प्रेमदान चौकामधील वेदांतनगरमधील (Vedantnagar) प.पू.श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या दर्शनासाठी गुरूपौर्णिमेस (Guru Purnima) भाविकांनी अलोट गर्दी केली होती. भारतभरासह अमेरिका येथून आलेल्या गुरूबंधू-भगिनींनी गुरूदेवांचे दर्शन घेत श्रीदत्त क्षेत्रमधील (Shri Datta Devasthan) श्री सद्गुरू अधिष्ठान मंडपात गुरूचरणी लीन होण्यातील धन्यता अनुभवली.
स्मृतीमंदिर विविध फुलांनी आकर्षकरित्या सजविले
गुरूपौर्णिमा उत्सवाच्या पूर्वसंध्येला देवस्थान मधील श्री महालक्ष्मी मंडपात कायम विश्वस्त श्री.मिलिंद क्षीरसागर यांच्या हस्ते पाठशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नवीन वस्रांची भेट देण्यात आली. श्रीदत्तक्षेत्रमधील श्रीदत्तात्रेय निवास, भगवान श्रीदत्तात्रेय मंदिर, प.पू.गुरूदेवांचे अधिष्ठान आणि तपोवन रोडवरील प.पू.श्रीगुरूदेवांचे स्मृतीमंदिर विविध फुलांनी आकर्षकरित्या सजविले होते. केळीचे खुंट, तोरणे आणि रंगीत सुरेख रांगोळ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होत्या.
श्री दत्तात्रेय निवास येथे पहाटेच्या महापूजेनंतर श्री महाराजांच्या आज्ञेने आणि परंपरेने पवित्र वातावरणामध्ये श्री व्यासपूजन संपन्न झाले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
विद्यार्थ्यांनी पाठशाळेतील अध्यापकांचे गुरूपूजन (Shri Datta Devasthan)
श्रीमन् नृसिंह सरस्वती तपोवन येथील स्मृतीमंदिराच्या गर्भगृहात श्रीगुरूपादुकांवर लघुविष्णू अभिषेक वेदांत विद्यापीठातील विद्यार्थी आणि गुरूजी यांचेकडून करण्यात आला. याचवेळी श्रीदत्तक्षेत्रमधील भगवान श्रीदत्तात्रेय मंदिराचे गर्भगृहात लघुविष्णू अभिषेक सोहळा संपन्न झाला. पहाटे ५ वाजता अभिषेक सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. सकाळी ८ वाजता मंदिराच्या गर्भगृहात व्यासपूजा करण्यात आली. सकाळी ९ वाजता वेदांत विद्यापीठ मधील विद्यार्थ्यांनी पाठशाळेतील अध्यापकांचे गुरूपूजन केले. यावेळी वेदान्त विद्यापीठाच्या वेद विभागाचे प्रधान अध्यापक वेदमूर्ती श्री. समीहन कोल्हटकर गुरूजी, ऋग्वेद विभागातील अध्यापक वेदमूर्ती श्री.अनंत चानसीकर, वेदमूर्ती श्री.भानुदास जोशी, वेदमूर्ती श्री.निलेश जोशी, अथर्ववेद विभागातील अध्यापक वेदमूर्ती श्री.गजानन कुलकर्णी, सामवेद विभागातील अध्यापक वेदमूर्ती श्री. शिवानंद माळेगांवकर, शुक्ल यजुर्वेद विभागातील अध्यापक वेदमूर्ती श्री. योगानंद माळेगांवकर, कृष्ण यजुर्वेदाचे अध्यापक वेदमूर्ती श्री.अजिंक्य दीक्षित गुरुजी हे उपस्थित होते. दुपारी १२ वाजता सामुदायिक महाआरती होवून उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत श्री महालक्ष्मी मंडपात प.पू. श्रीगुरूदेवांची पाद्यपूजा गुरूदेवांचे घराण्यातील श्री. महेंद्र क्षीरसागर, कोथरूड सत्संग अध्यक्ष श्री.आशिष बेडेकर, पिंपरी-चिंचवड सत्संग अध्यक्ष श्री. मंदार भावे यांच्या हस्ते भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सोहळ्यामध्ये २५ सत्संग मंडळांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. पाद्यपूजा झाल्यावर पू.पू. गुरूदेवांनी दिलेल्या दृकश्राव्य आशीर्वाद श्रवणाचा लाभ सर्वांनी घेतला. पसायदानाने पाद्यपूजा सोहळ्याची सांगता करण्यात आली. उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. आर.जे.जाधव यांनी या भावपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. श्री दत्तात्रेय निवास, भगवान श्रीदत्तात्रेय मंदिर आणि स्मृतीमंदिर या स्थळी भाविकांनी अत्यंत शिस्तबध्दरितीने रांगा लावून शांतपणे दर्शनाचा आनंद घेतला.
देवस्थानचे कायम विश्वस्त श्री.मिलिंद क्षीरसागर, उत्सव समिती अध्यक्ष श्री. आर जे जाधव, समितीचे सदस्य सर्वश्री गणेश पंडित, नैनेश पाटणकर, दिपक कानडे, संजय सोनार, दिलीप बोडके, वसंत पाटील, प्रसाद पुराणिक, शैलेश काळे, ऋषिकेश हिरवे, दिगंबर धारूरकर, सर्व सत्संग मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सभासद कार्यकर्ते, आणि देवस्थानचा कर्मचारी वृंद या सर्वांनीच गुरूपौर्णिमा सोहळ्याच्या यशस्वितेसाठी अथक परिश्रम घेतले. गुरूबंधू आणि गुरूभगिनींनी श्रध्देने गुरूपौर्णिमा सोहळ्यात सहभागी होवून गुरूसेवेचा आनंद घेत या सोहळ्यात आपापल्यापरिने योगदान दिले.



