Ashok Chavan : नगर : महाराष्ट्र राज्याचे एकेकाळी मुख्यमंत्री राहिलेल्या आणि महाराष्ट्र काँग्रेस (Congress) मधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघांमध्य झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. परंतु, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
नक्की वाचा: आरक्षणासाठी सकल मराठा समाज आक्रमक; ‘या’ दिवशी महाराष्ट्र बंदची हाक
अशोक चव्हाण नॉट रिचेबल (Ashok Chavan)
अशोक चव्हाण यांचा मोबाईल फोन सध्या नॉट रिचेबल आहे. त्यामुळे नांदेड काँग्रेसच्या वर्तुळात कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील, अशी चर्चा होती. राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतरही अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात सरकारने निधी दिला होता. याशिवाय, बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याचा विचार करत होते, अशी चर्चा होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बहुमत चाचणीवेळी मविआचे काही आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. भाजपला मदत करण्याासाठीच या आमदारांनी बहुमत चाचणीला येणे टाळल्याची चर्चा होती. यामध्ये अशोक चव्हाण यांचा समावेश होता. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याचा अहवाल मागवून या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती. या सगळ्या घडामोडींमुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील, अशी अटकळ बांधली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरताना दिसत आहे.
हे देखील वाचा: शेतकऱ्यांचं आंदोलन 2.0 उद्या दिल्लीत धडकणार
भाजपकडून अशोक चव्हाणांना राज्यसभेची ऑफर? (Ashok Chavan)
अशोक चव्हाण यांच्यासोबत मराठवाड्यातील काही आमदार भाजपमध्ये जाऊ शकतात. याशिवाय, मुंबईतील काँग्रेस नेते नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे हेदेखील अशोक चव्हाण यांच्यासोबत पक्ष सोडू शकतात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारभारावर अशोक चव्हाण नाराज असल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक चव्हाण हे काल काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी त्यांची देहबोली फारशी चांगली दिसत नव्हती. परवा त्यांनी काँग्रेसच्या जिल्हा स्तरावरील बैठकीला दांडी मारली होती. गेले दोन दिवस अशोक चव्हाण हे दिल्लीत होते. याठिकाणी भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. भाजपकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. आज भाजपची राज्यसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल, त्यामध्ये चव्हाणांचे नाव असू शकते.