नगर : प्लॉट खरेदी-विक्री करणाऱ्या व्यवसायिकावर शेवगावमध्ये जीवघेणा हल्ला (attack) झाला होता. या प्रकरणातील आरोपींना (accused) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथका (Local Crime Branch) ने जालना जिल्ह्यातील अंबड येथून जेरबंद केले. सुधीर हरिभाऊ बाबर (रा. ब्राह्मण गल्ली, शेवगाव) व सुमित सुधीर बाबर (रा. ब्राह्मण गल्ली, शेवगाव) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत.
शेवगावमधील शास्त्रीनगर येथे सुभाष खरड राहतात. त्यांच्याकडून आरोपींनी हातऊसणे पैसे घेतले होते. ते पैसे खरड यांनी पुन्हा मागितले होते. याचा राग आल्याने आरोपींनी खरड यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपींनी खरड यांना चाकू व लोखंडी रॉडने मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी जीवघेणा हल्ल्याची गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा समांतर तपास जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक तैनात केले होते. या पथकाने शेवगावमध्ये आरोपीचा शोध घेतला. पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास केला असता आरोपी हे जालना जिल्ह्यातील अंबड येथे पसार झाल्याचे समजले. त्यानुसार पथकाने अंबड येथे सापळा रचून आरोपींना जेरबंद केले. पथकाने आरोपींना शेवगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत.