नगर : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचारावरून अमरावतीमध्ये (Amravati) राडा झाला आहे. सायन्स कोर मैदानावरून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात वाद सुरू झाला आहे. अमरावतीचं सायन्स कोर मैदान बच्चू कडू यांनी २३आणि २४ अशा दोन तारखेला बुक केलेलं आहे. मात्र या ठिकाणी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी अमित शाह सभा घेणार आहेत. अमित शाह यांच्या सभेसाठी पोलिसांनी सायन्स कोर मैदान ताब्यात घेतलं आहे.
नक्की वाचा : राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट;विदर्भात गारपिटीचा इशारा
आज (ता.२३) बच्चू कडू त्यांच्या सभेच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांसह येथे आले असताना त्यांना पोलिसांनी आत जाण्यास मज्जाव केला. आमच्याकडे निवडणूक आयोगाची परवानगी असतानाही आमची अडवणूक का करत आहात? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला. तसेच पोलीस अधिकारी गणेश शिंदे यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता बच्चू कडू पोलिसांवर संतापले.
बच्चू कडूंनी निवडणूक आयोगाने दिलेले परवानगीचे पत्र पोलिसांसमोरच फाडले (Bacchu Kadu)
पोलीस भाजपाचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे आमची समजूत का घालत आहेत? अमित शाह यांच्या सभेसाठी जर परवानगी मिळाली असेल तर त्यांनी ती दाखवावी, अन्यथा ज्यांना परवानगी मिळाली आहे, त्यांना सभा घेऊ द्यावी, असे बच्चू कडू म्हणाले. मात्र पोलिसांनी सुरक्षेचे कारण पुढे करत त्यांना मैदानात येऊ दिले नाही. पोलीस आपले ऐकत नाहीत, हे पाहिल्यानंतर बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाने दिलेले परवानगीचे पत्र पोलिसांसमोरच फाडून टाकले. पोलिसांनी आपल्या गळ्यात भाजपाचा पट्टा घालावा आणि गाडीवर भाजपाचे झेंडे लावावेत, अशीही टीका बच्चू कडू यांनी केले.
अवश्य वाचा : लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरची हवेत धडक; १० जणांचा मृत्यू
काय आहे प्रकरण ? (Bacchu Kadu)
अमरावतीच्या सायन्स कोअर मैदानावर २१ आणि २२ एप्रिल रोजी नवनीत राणा यांच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली होती. तर बच्चू कडू यांना २३ आणि २४ एप्रिलसाठी परवानगी मिळाली होती. त्यासाठी रितसर पैसेही भरण्यात आले होते. मात्र अमित शाह यांचा दौरा २४ एप्रिल रोजी ठरल्यामुळे पोलिसांनी बच्चू कडू यांना मैदानावर येऊ दिले नाही. त्यामुळे हा प्रकार घडला.