नगर : पुण्यातील भिडेवाडा (Bhide wada) आता फक्त फोटोत पाहायला मिळणार आहे. कारण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातली मुलींची पहिली शाळा सुरू केलेला भिडेवाडा इतिहासजमा झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) हा वाडा रात्री (ता. ४) पोलीस बंदोबस्तात पाडला (demolished) आहे. आता या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक (National Monument) उभं राहणार आहे.
नक्की वाचा : ‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या’ – सुप्रिया सुळे
पुण्यातील भिडेवाडा हा शहराच्या मध्यवस्तीत होता. त्यामुळे वाहतुक कोंडी होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने रात्री अकरानंतर हा वाडा पाडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रात्री पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पडली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठ परिसरातील भिडे वाड्यात मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू केली होती.
मात्र जसजसा काळ पुढे गेला तसतसा हा वाडा जीर्ण झाला. त्यामुळे या वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी ‘मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक समिती’च्या वतीने पुढे आली होती. त्याला पुणे महापालिका आणि राज्य सरकारनेही सहमती दर्शवली होती. मात्र या वाड्यासंदर्भातील स्थानिक रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली होती.
हेही वाचा : राेहित पवारांच्या पाठपुराव्याला यश; उद्यापासून सुटणार कुकडीचे आवर्तन
इथे स्मारक बनवण्यासाठी तब्बल तेरा वर्षे संघर्ष करावा लागला. आता न्यायालयाच्या आदेशानुसार एक महिन्यामध्ये जागा रिकामी करून ती महापालिकेला हस्तांतरीत करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता भिडेवाडा हा इतिहासजमा झाला आहे. आताआता या जागी राष्ट्रीय दर्जाचं स्मारक लवकरच उभारलं जाणार आहे.