Congress : श्रीगोंदा : कांदा निर्यात (Onion export) बंदी करणे, दूध हमीभाव मागणीकडे दुर्लक्ष करणे व इथेनॉल उत्पादनावर बंदी घालण्याच्या निर्णयावरून केंद्र व राज्य सरकार (Central and State Govt) शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय असंवेदनशील आहे. सरकारच्या या नाकर्तेपणाविरुद्ध मंगळवारी (ता. १२) जिल्हाधिकारी कार्यालय नगर येथे हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा काँग्रेस (Congress) कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे (Rajendra Nagwade) यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.
हे देखील वाचा : राष्ट्रवादी’च्या संघर्ष यात्रेचा मंगळवारी नागपुरात समाराेप; शरद पवार, उद्धव ठाकरे यांची उपस्थिती
केंद्र तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळत असल्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार उदासीन असल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना खर्चाच्या प्रमाणात हमीभाव मिळणे आवश्यक असताना शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. कांद्याला दोन पैसे मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांना वाटत असतानाच त्यावर निर्यात बंदी घातली. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित आहे. विमा पॉलिसीचे अग्रीम हप्ते सर्वांना मिळालेले नाहीत. मागील अतिवृष्टीचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करून साखर कारखान्यांनी इथेनॉल प्लांट उभे केले. आता त्याचे उत्पादन घेऊन कर्जफेड करणे गरजेचे असताना शासनाने त्यावर बंदी घातली. या तुघलकी निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन ते अडचणीत येणार आहेत.
नक्की वाचा : दोघांच्या भांडणात पोलिसांना मार
नागवडे म्हणाले, शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव मिळावा, कांद्यावरील निर्यात बंदी त्वरित उठवावी, विमा पॉलिसीचा अग्रिम हप्ता सरसकट सर्वांना मिळावा, गारपीटग्रस्त उपाययोजना सर्व मंडळांना लागू कराव्यात, मागील अतिवृष्टीचे थकित अनुदान सर्वांना त्वरित अदा करावे, ऑनलाइन पीक पाहणीची अट रद्द करण्यात यावी, कारखान्यांना इथेनॉल उत्पादनावर घातलेली बंदी त्वरित उठवावी या प्रमुख मागण्यांकरिता हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. तरी शासन दरबारी आपल्या मागण्या मांडण्याकरिता काँग्रेस पक्षातर्फे आयोजित केलेल्या या हल्लाबोल आंदोलनात जिल्हा महिला काँग्रेस, युवक काँग्रेस व काँग्रेस अंतर्गत सर्व सेलचे पदाधिकारी व सदस्य आणि जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष नागवडे यांनी केले आहे.