Deep fake video : नगर : सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) धामधूम सुरु आहे. या निवडणुकीत प्रचार करण्यासाठी सोशल मीडियाचा (Social media) मोठा वापर केला जात आहे. यासाठी निवडणूक प्रचारात काही समाजकंटक व समाज विघातक वृत्तीच्या लोकांकडून विरोधकांचा अपप्रचार करून प्रतिमा मालिन करण्यासाठी अनेक कारस्थाने केली जात आहेत. त्यासाठी लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडीओ (Deep fake video) क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमांमध्ये प्रसारित करण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढतो आहे. यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी विविध स्तरातून होत असताना राज्य सरकारने या मागणीची दखल घेतली आहे. अशा प्रकारचा कंटेट शेअर करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारने पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
हे देखील वाचा: जातीवाचक शिवीगाळ, नग्न करुन मारहाण; तरुणाची आत्महत्या
तंत्रज्ञानाचा गैरवापर
मागील काही दिवसांपासून फोटोशॉप, मशीन लर्निंग (एमएल) किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यांसारख्या विविध तंत्रज्ञानाचा गैरवापर करून डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करण्यात येत आहे. निवडणुकीदरम्यान या तंत्राचा गैरवापर हा चिंतेचा विषय असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.
नक्की वाचा: नरेंद्र माेदींकडून आराेग्य विकास प्रक्रियेशी जाेडण्याचे महत्त्वपूर्ण काम : राधाकृष्ण विखे पाटील
फोटो, ऑडिओ, व्हिडिओमध्ये फेरफार (Deep fake video)
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एखादा उमेदवार, राजकीय पक्ष किंवा निवडणुकीच्या मुद्द्याविषयी चुकीचे व्हिडीओ, ऑडिओ, फोटो तयार करण्यात येतात किंवा खऱ्या फोटो, ऑडिओ, व्हिडिओमध्ये फेरफार करून ते चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात येतात. असे चुकीच्या पद्धतीने तयार केलेले डीप फेक व्हिडीओज, क्लिप्स किंवा फोटो हे एकदम खरे असल्यासारखे भासतात आणि त्यामुळे संबंधिताविषयी गैरसमज किंवा बदनामी होते. त्यामुळेच राज्य सरकारने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.
महत्त्वाचे म्हणजे निवडणूक काळात अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असून यावर आळा घालण्यासाठी ‘डीप फेक’ कंटेंट तयार करणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्या समाजकंटकांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना राज्य सरकारने प्रशासनाला दिल्या आहेत. राज्य शासनामार्फत पोलीस महासंचालकांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असून पोलीस खात्यामार्फत यासंदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे.