Drama | नगर : फक्त चूल आणि मूल या संकल्पनेला छेद देऊन महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावं. तिच्या मनातील सुप्त इच्छाशक्तीला कुटुंबाने आणि विशेषत: पतीने साथ द्यावी, असा आशय घेऊन कोपरगावच्या संकल्पना फाउंडेशनने काल (ता.३०) राज्य नाट्य स्पर्धेत ‘कधी आंबट कधी गोड’ हे नाटक (Drama) अहिल्यानगर (Ahilyanagar) केंद्रावर सादर केले.
नक्की वाचा : मोठी बातमी! ‘या’ विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी
नाटक पाच पात्रांभोवती फिरत राहतं (Drama)
डॉ. किरण लद्दे लिखित आणि दिग्दर्शित हे विनोदी नाटक पाच पात्रांभोवती फिरत राहतं. नाटकातील प्रमुख पात्र असलेला ओमकार (डॉ. मयूर तिरमखे) हा पेशाने बँकर आहे. त्याची नुकतीच ग्रामीण भागातून पुण्यात बदली झाली आहे. लग्नाला पाच वर्षे उलटूनही स्वतःच्या पायावर उभा राहिल्याशिवाय मूलबाळ होऊ देणार नाही, अशी भुमिका घेणारी त्याची बायको कल्पना (डॉ. श्रद्धा तिरमखे), सासू यशोदा (कल्याणी बनसोडे), मेव्हणा विनोद (प्रथमेश पिंपळे) आणि नाटकाचे सूत्रधार असलेले डॉ. किरण लद्दे यांनी ओमकारच्या मित्राची छोटी पण महत्वाची भुमिका सांभाळली. ओमकारला मूलं हवंय तर कल्पना स्वतःच्या भुमिकेवर ठाम आहे. कल्पनाला स्वतःचा नवीन उद्योग सुरू करण्यासाठी भांडवल हवं असल्यामुळे तिचे ओमकारसोबत वाद होतात. यातून पती-पत्नीच्या नात्यातील विविध कंगोरे उलगडत दोघांनाही एकमेकांच्या चुका उमगतात आणि शेवटी दोघांनाही अभिप्रेत गोष्टी मिळतात. कल्पनाचा उद्योगात चांगला जम बसतो आणि यथावकाश त्यांना जुळं होऊन नाटक संपतं.
अवश्य वाचा : देशात पेट्रोलऐवजी बायोइथेनॉलवर वाहने धावणार’-नितीन गडकरी
संथ संहिता (Drama)
नाटक विनोदी असूनही लेखकाने संहिता संथ ठेवल्यामुळे सादरीकरणातही संथता जाणवली. बँकर असलेल्या ओमकारच्या पात्राची भाषाशैली ग्रामीण असल्यामुळे त्याच्या पेशाला साजेशी वाटली नाही. मात्र, त्याने ही विनोदी भूमिका चांगली पार पाडली. त्यामुळेच त्याच्या काही संवादांना प्रेक्षकांनी हसून दाद दिली. विनोद हे पात्र काही ठिकाणी अतिशयोक्ती वाटलं. यशोदा आणि कल्पना या दोन्ही पात्रांचं सादरीकरण ठिक-ठाक म्हणावं लागेल.
चेतन गवळी व अमित तिमरखे यांनी साकारलेलं नेपथ्य चांगलं होतं. गणेश सपकाळ यांनी प्रकाशयोजना सांभाळली. मात्र, काही प्रसंगांमध्ये ती अधिक प्रभावीपणे करता आली असती. मोनिका सपकाळ, डॉ. आस्था तिरमखे, स्नेहल लद्दे यांनी केलेली वेशभूषा व रंगभूषाही उत्तम होती. काही प्रसंगांमध्ये विनोदी संगीत देण्याचा प्रयत्न मात्र फसला. नाटकादरम्यान वाजणारे शीर्षक गीत उत्तम होते.
संहिता अजून प्रभावी असती तर नाट्यरसिकांची निराशा टाळता आली असती. खरंतर एवढा गंभीर विषय विनोदी अंगाने मांडण्याचं धाडस डॉ. किरण लद्दे यांनी दाखवलं मात्र, याला विनोदाची फोडणी बसलीच नाही, असं म्हणता येईल.