Drama : नगर : आजकाल कोणत्याही कलाकाराला आपले अभिनय (Acting) कौशल्य सादर करण्यासाठी चित्रपट (Film), मालिका, ओटीटी, समाजमाध्यमे अशी विविध व्यासपीठे उपलब्ध आहेत. एकीकडे ही नवी माध्यमं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. तसेच तुलनेने अर्थार्जन मिळण्यात तफावत असूनही या सगळ्यांना एकमेकांशी जोडून ठेवणारा धागा म्हणजे नाटक (Drama), असा संदेश देणारं ‘पंचमवेद’ हे नाटक रविवारी (ता. १) अहिल्यानगर (Ahilyanagar) केंद्रावर सादर झालं.
अवश्य वाचा : मुकुंदनगर खून प्रकरणातील आरोपीला पुण्यातून घेतले ताब्यात
मुंबईत नशीब अजमावण्यासाठी आलेल्या कलाकारांवर कथानक
सप्तरंग थिएटर्स, अहिल्यानगर निर्मित या नाटकाचं लेखन डॉ. राजेंद्र धामणे यांनी तर दिग्दर्शन डॉ. श्याम शिंदे यांनी केलं आहे. एका राज्य नाट्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या दृश्याने नाटकाची सुरुवात होते. आमदार असलेले दादासाहेब (प्रा. डॉ. सचिन मोरे) आणि नाट्यशास्त्राचे अभ्यासक असलेले दाजीसाहेब (सागर अधापुरे) यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात येते. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतून आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून मुंबईत नशीब अजमावण्यासाठी आलेले तरुण कलाकार रंगो (ऋषिकेश सकट), पी. बाळू (पराग पाठक), नामदेव (पृथ्वी सुपेकर), निखिल (तेजस आंधळे), नयन (आकांक्षा शिंदे) काम मिळवण्यासाठी धडपडत असतात.
नक्की वाचा : कधी होणार यंदाचा महा कुंभमेळा? वाचा सविस्तर…
एका राजकीय नेत्याचे गुंड आमच्या भावना दुखावल्या म्हणत रंगोला शोधत त्यांच्या रूमवर येतात आणि सर्वांना काळे फासून त्यांचे व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल करतात. त्यामुळे उद्विग्न होऊन रंगो, पी. बाळू आणि नामदेव मुंबईला रामराम ठोकून गावाकडे जाण्यासाठी बस स्टॅन्डवर जातात आणि तिथे त्यांना दाजीसाहेब भेटतात. ते त्यांना गावाकडे जाण्यापासून परावृत्त करत असतानाच नयनचा फोन येतो की, निखिलने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सर्वजण पुन्हा रूमवर एकत्र येतात. दाजीसाहेब सर्वांना एकत्र घेऊन नाटक बसवतात आणि शेवटी त्यांच्या नाटकाच्या सादरीकरणाने नाटकाचा पडदा पडतो.
संवादांना प्रेक्षकांनी चांगली दाद (Drama)
आमदार असलेल्या दादासाहेबांचा अनौरस पुत्र असूनही स्वबळावर मोठं होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या स्वाभिमानी निखिलची भूमिका तेजस आंधळे यांनी उत्तमपणे निभावली. शेवंता (स्वाती बोरा), वडील (प्रा. सुनील कात्रे), राखी गोरखा यांच्या छोट्या भूमिका चांगल्या होत्या. दमदार संहिता असल्यामुळे काही संवादांना प्रेक्षकांनी चांगली दाद दिली.
ऋषिकेश सकट याने भूमिका आणि सहाय्य्क दिग्दर्शक अशा दोन्ही जबाबदाऱ्या पेलल्या. दीपक ओहोळ, सुधीर देशपांडे, समीर कुलकर्णी यांनी चांगले नेपथ्य साकारले. विक्रम गवांदे आणि गीता शिंपी यांनी प्रकाशयोजना सांभाळली. काही प्रसंगांमध्ये प्रकाशयोजना फसल्याचे जाणवले. श्रावणी हाडोळे आणि कल्पेश शिंदे यांचे संगीत ठिकठाक होते. चंद्रकांत सैंदाणे आणि कुंदा शिंदे यांनी केलेली वेशभूषा व रंगभूषा उत्तम होती. रंगमंच व्यवस्था राम पठारे, डॉ. बापू चंदनशिवे आणि विलास यांनी पाहिली.
पाचवा वेद म्हणून मान्यता मिळालेल्या नाट्यशास्त्राच्या पंचमवेदाचे महत्व डॉ. राजेंद्र धामणे यांनी नाटकातील पात्रांद्वारे योग्यरित्या विशद केले आहे. मात्र, एकंदरीत कथानक पाहिल्यावर ‘पंचमवेद’ हे नाव नाटकाला समर्पक आहे का? हा प्रश्न पडतो. सध्या अभिनयासाठी अनेक नवनवीन माध्यमे उपलब्ध असताना या सर्वांचा पाया असलेली नाट्यकला जोपासण्यासाठी नाटक केले पाहिजे. हा आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरले, असे म्हणता येईल.