Drama : नगर : अनादी काळापासून समाजात जातीयवादाचे विष पेरून माणसाला माणसापासून वेगळे केले जात आहे. धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली समाजात पसरवली जाणारी विषमता मोडित निघावी. यासाठी अनेक महापुरुषांनी प्रयत्न केले. यात राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे मोठे योगदान होते. आपल्या न्याय्य हक्कांसाठी व्यवस्थेसोबत संघर्ष करताना या महापुरुषांनी दिलेले विचार कितीही प्रयत्न केले तरी संपणार नाहीत, असा संदेश देणारं ‘राजर्षी’ हे नाटक (Drama) संगमनेरच्या संगम ग्रामविकास मंडळाने सोमवारी (ता. २) राज्य नाट्य स्पर्धेच्या (Drama Competition) अहिल्यानगर केंद्रावर सादर केलं.
नक्की वाचा : ‘एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी’-रोहित पवार
सुधारणावादी धोरणांचा दुरुपयोग यावर हे नाटक बोट ठेवते
सामाजिक अस्पृश्यता पुसण्यासाठी तत्कालीन महापुरुषांनी आणलेल्या सुधारणावादी धोरणांचा आज चाललेला दुरुपयोग यावर हे नाटक बोट ठेवते. डॉ. सोमनाथ मुटकुळे लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाच्या सुरुवातीलाच एक नेता पोलीस अधिकाऱ्याला (राजन झांबरे) एक आरक्षण आंदोलन चिरडून टाकण्याचे फोनवर आदेश देतो. या आदेशामुळे चिडलेला असहाय्य पोलीस अधिकारी राजकीय व्यवस्थेला शिव्या देत असतानाच अब्दुल (ज्ञानेश्वर वर्षे) आणि स्वाती (पूनम कदम) हे एक प्रेमी जोडपं प्रवेशतं. त्यांना आंतरधर्मीय विवाह करायचा असल्यामुळे ‘लव्ह जिहाद’चा आरोप करून काहीजण त्यांना मारण्यासाठी धावतात. त्यामुळे स्वतःचा बचाव करण्यासाठी हे जोडपं पोलीस स्टेशन गाठतं. पोलीस अधिकारी या दोघांचे सत्यशोधकी पद्धतीने लग्न लावण्याचा निर्णय घेतात. तरीही या दोघांना काही प्रश्न पडतात. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी महात्मा फुले (सूर्यकांत शिंदे), राजर्षी शाहू महाराज (दिनेश भाने) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (नरेश बडेकर) या महापुरूषांचे प्रवेश होतात. शेवटी पोलीस ठाण्यात अब्दुल आणि स्वातीला त्यांचेच पालक गोळ्या घालून संपवतात. त्यात पोलीस देखील जीव गमावतात. अखेर इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत स्वाती-अब्दुल जीव सोडतात आणि तीनही महापुरुषांच्या एकत्रित संदेशाने नाटक संपते.
दमदार संवादांनी प्रेक्षकांच्या मिळवल्या टाळ्या (Drama)
भोला ही पोलीस हवालदाराची भूमिका बाबासाहेब मोकळ यांनी चांगली केली. मात्र, त्यांना काही संवादामध्ये ‘प्रॉम्प्टिंग’चा आसरा घ्यावा लागल्याचे स्पष्टपणे दिसले. इतर छोट्या-मोठ्या भूमिकाही ठिकठाक होत्या. डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी लेखन, दिग्दर्शन आणि नाटकातील नारायणभट या तीनही भूमिका पेलल्या. नेपथ्य, वेशभूषेत अनेक चुका असूनही काही दमदार संवादांनी प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. दोन प्रसंग जोडताना नेपथ्यातील बदल विनाविलंब आणि प्रेक्षकांच्या नकळत होणे अपेक्षित होते. पहिल्या दृश्यापासूनच गंभीर तांत्रिक चुका असूनही विषय चांगला असल्याने नाटकाने प्रेक्षकांची दाद मिळवली. त्यामुळे नाटकाच्या माध्यमातून सामाजिक उणिवा अधोरेखित करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले, असे म्हणता येईल.