Football : शहरातील 3 खेळाडूंची कनिष्ठ राष्ट्रीय फुटबॉल कॅम्पसाठी निवड

Football : शहरातील 3 खेळाडूंची कनिष्ठ राष्ट्रीय फुटबॉल कॅम्पसाठी निवड

0
Football : शहरातील 3 खेळाडूंची कनिष्ठ राष्ट्रीय फुटबॉल कॅम्पसाठी निवड
Football : शहरातील 3 खेळाडूंची कनिष्ठ राष्ट्रीय फुटबॉल कॅम्पसाठी निवड

महाराष्ट्र संघ निवडीसाठी मुंबईत होणार प्रशिक्षण

Football : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील फुटबॉलच्या (Football) इतिहासात प्रथमच शहरातील 3 खेळाडूंची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाद्वारे (All India Football Federation) आयोजित करण्यात येणाऱ्या कनिष्ठ राष्ट्रीय फुटबॉल कॅम्पसाठी (Junior National Football Camp) निवड करण्यात आली आहे. यामध्ये कृष्णराज गुरुदत्त टेमकर, भानुदास पंढरीनाथ चंद आणि जसवीर कुलदीपसिंग ग्रोव्हर यांचा समावेश आहे.

नक्की वाचा : साईभक्तांसाठी मोठी बातमी;शिर्डीतील सर्व दुकानांसाठी आता एकच दरपत्रक 

राज्य अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी

उदयोन्मुख खेळाडूंसाठी अत्यंत मानाची अशी समजल्या जाणाऱ्या डॉ. बी.सी. रॉय चषक (ज्युनिअर बॉईज राष्ट्रीय स्पर्धा) मध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी सदर खेळाडूंची निवड झाली आहे. या खेळाडूंनी नोव्हेंबर 2024 मध्ये पार पडलेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करताना निवड समितीचे लक्ष वेधले. त्यांच्या खेळातील कौशल्य, मैदानावरील चपळता आणि संघभावना यामुळे त्यांची निवड राष्ट्रीय पातळीवरील कॅम्पसाठी करण्यात आली आहे.

अवश्य वाचा :  रेल्वेभाडेवाढ ते तत्काळ तिकीट;भारतीय रेल्वेच्या नियमामध्ये आजपासून मोठे बदल 

मुंबई येथील मैदानावर उच्च दर्जाचे मार्गदर्शन (Football)

या खेळाडूंच्या कामगिरीमुळे जिल्ह्याच्या संघाने राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर अशा मातब्बर संघांचा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. कृष्णराज टेमकर आणि भानुदास चंद हे आठरे पाटील पब्लिक स्कूलचे तर जसवीर ग्रोव्हर हा तक्षिला स्कूलचा विद्यार्थी आहे. प्रशिक्षण शिबिराची सुरुवात पुढील आठवड्यात मुंबई येथील कूपरेज मैदानावर होणार असून उच्च दर्जाचे मार्गदर्शन, आधुनिक प्रशिक्षण पद्धती आणि तांत्रिक ज्ञान या खेळाडूंना मिळणार आहे.

जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव रौनप फर्नांडिस यांनी खेळाडूंच्या निवडीबद्दल माहिती देताना सांगितले की, या खेळाडूंची निवड ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असून, हे यश खेळाडूंच्या कष्टाचे आणि त्यांचे प्रशिक्षक, पालक आणि जिल्हा फुटबॉल संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील युवा खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडू येत्या दिवसात राष्ट्रीय पातळीवर झळकावेत यासाठी प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.