नगर : नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील (Government Hospital) रुग्णांच्या मृत्यू प्रकरणावरून राज्य सरकार (State Govt) वर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. नांदेड येथील रुग्णालयात गेल्या सात दिवसांत एकूण ८३ जणांचा मृत्यू (death) झालाय. राज्याच्या आराेग्य व्यवस्थेचा पुरता बाेजवारा उडाला आहे. नांदेडसह महाराष्ट्राच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव सुरू आहे, अशी टीका काँग्रेस (Congress) विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सरकारवर करत आरोग्यव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे.
थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र लिहिले आहे की, राज्याची संपूर्ण आरोग्य व्यवस्था सलाईनवर गेली आहे. आरोग्य मंत्री म्हणतात, याला काही मी एकटा जबाबदार नाही, ही संपूर्ण मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे. संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला पाहिजे. कोरोनाच्या कठीण काळात हीच यंत्रणा जीव तोडून काम करत होती. याच यंत्रणेने महाराष्ट्रातल्या अनेक गंभीर रुग्णांना वाचवले, कारण तेव्हाच्या सरकारचा तो प्रामाणिक होता. मात्र, यावर्षी असे काय घडले, की ज्यामुळे आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत आहे. शासनाचे आरोग्य क्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.