नगर : भारताच्या ताज्या लोकसंख्येबाबत (Population) संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीचा एक अहवाल समोर आला आहे. यूएनएफपीए (UNFPA Report) म्हणजेच संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर पोहोचली आहे. यामध्ये ० ते १४ वयोगटातील २४ टक्के लोकसंख्या आहे, असा अंदाज आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या जागतिक लोकसंख्या २०२४ च्या अहवालात भारताची लोकसंख्या ७७ वर्षांमध्ये दुप्पट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नक्की वाचा : रामभक्तांच्या अलोट गर्दीने संगमनेरकर भारावले
लोकसंखेबाबत भारताने चीनला टाकले मागे (India Population)
भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. चीन देशाची लोकसंख्या १४२.५ कोटी इतकी आहे. ताज्या आकडेवारीनुसार, भारताने चीनला मागे टाकले असल्याचं दिसत आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेत भारताची लोकसंख्या १२१ कोटी होती. या अहवालानुसार समोर आलंय की, भारतातील अंदाजे २४ टक्के लोकसंख्या ० ते १४ या वयोगटातील आहे. तर १७ टक्के लोकसंख्या १० ते १९ या वयोगटातील आहे. एवढेच नाही तर १० ते २४ वयोगटात २६ टक्के, तर १५ ते ६४ वयोगटातील संख्या ६८ टक्के आहेत. याव्यतिरिक्त, भारतातील ७ टक्के लोकसंख्या ६५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाची आहे. पुरुषांचे सरासरी आयुर्मान ७१ वर्षे आणि महिलांचे ७४ वर्षे आहे.
अवश्य वाचा : साखर उत्पादनात महाराष्ट्राची विक्रमी वाटचाल; सलग तिसऱ्या वर्षी उत्तर प्रदेशला मागे टाकत सर्वाधिक उत्पादन
सन २००६ ते २०२३ भारतातील लोकसंख्येपैकी २३ टक्के लोकांचे बालविवाह झाले आहेत. त्याचसोबत भारतात माता मृत्यूच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झालेली आहे. ६४० जिल्ह्यांमध्ये केलेल्या अलीकडील संशोधनामध्ये समोर आलं आहे की, सुमारे एक तृतीयांश जिल्ह्यांमध्ये माता मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले गेलेत. काही जिल्ह्यांमध्ये माता मृत्यूचं प्रमाण एक लाखामागे ११४ ते २१० आहे.