Jayant Patil : कर्जत : सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) राजकीय पक्षावर दरोडा घालण्याचे काम होत असून सरकारी यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर काम करते याची खंत वाटते. या कार्यपद्धतीने देशातील लोकशाही (Democracy) धोक्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सक्षमपणे उभारण्याची जबाबदारी तुम्हा-आम्हास पार पाडायची आहे. कालच्या निर्णयाने पक्ष आणि चिन्ह गेले असले तरी पवार साहेबांचा विचार जन सामान्यात रुजविण्याचे काम मोठ्या जिद्दीने पुढे नेऊया. पक्ष, चिन्ह गेले पण आमचा ८४ वर्षांचा तरुण योद्धा आमच्या मागे खंबीरपणे उभा आहे. तोच आमचा पक्ष आणि आमचं चिन्ह आहे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले.
हे देखील वाचा: शरद पवार गटाकडून निश्चित केलेल्या पक्ष व चिन्हांची नावे आली समोर
निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध (Jayant Patil)
कर्जत येथे राष्ट्रवादी विजय निश्चय मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दंडाला काळ्या पट्ट्या लावत निवडणूक आयोगाच्या कालच्या निर्णयाचा विरोध केला. यावेळी आमदार रोहित पवार, युवकचे मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप वर्पे यांच्यासह कर्जत-जामखेड मतदारसंघाचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, दीड वर्षात दोन मोठे पक्ष फोडण्याचे काम या राज्यात घडले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेमध्ये प्रभावी असताना पक्षाची मालकी फोडली गेली. पक्ष फोडून लोकशाही धोक्यात आणली गेली. हा नवीन पायंडा राजकारणात पडत आहे. कार्यकर्त्यांचा नेता होतो. मात्र तोच नेता तुमच्या जीवावर मोठा होत असतो. आज पदाधिकारी निवडी झाल्या पण कोणत्या पक्षाचा झाला हे सांगता येत नाही याचे शल्य आहे. पण न्यायालयीन लढाईत आपले पक्षाचे नाव आणि चिन्ह नक्की पुन्हा मिळवू असा विश्वास उपस्थितांना दिला.
नक्की वाचा : अमित शाहांच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी निघणार : सुजय विखे पाटील
राजकारणात गुन्हेगारांचा शिरकाव (Jayant Patil)
मात्र, आज जे चिन्ह आणि नाव पक्षाला नाव मिळेल ते जनतेमध्ये रुजविणे आपली जबाबदारी आहे. पक्ष किंवा चिन्हापेक्षा पवार साहेबाचा विचार महत्त्वाचा आहे. आता पोलीस ठाण्यात गोळीबार करून न्याय मिळवण्याचा नवीन प्रकार भाजपाच्या या राज्यात सुरू झाला आहे. ज्याला गोळी मारली तो मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे हे विशेष म्हणावे लागते. असा प्रकार या महाराष्ट्रात घडतोय याचे दुःख वाटते. आज राजकारणात गुन्हेगारीकरण येत आहे. राजकारणात गुन्हेगारांचा शिरकाव होत आहे. हे कुठले राजकारण आहे. जेष्ठ मंत्र्यांस एक आमदार पेकाटात लाथ घालण्याची भाषा करतो. त्यास मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री साधा शब्द बोलत नाही. कुठे नेवून ठेवला आहे महाराष्ट्र याचे भान सत्ताधारी सरकारला नाही याची शोकांतिका वाटते. गुण्यागोविंदाने राहणारे दोन समाजात मनभेद करण्याचे पाप सरकार राजरोसपणे करीत आहे. विकासकामांचा दर्जा न पाहता आपल्या मर्जीतील ठेकेदारांना बील अदा करण्याचे काम या सरकारमध्ये सुरू आहे. महाराष्ट्रातील प्रशासकीय घडी विखरली गेली आहे. सरकारी यंत्रणा सत्ताधारीच्या इशाऱ्यावर काम करते. महिलांवर आत्याचार वाढत आहे. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. महागाई वाढत असून केंद्र आणि राज्य सरकार गप्प का? असा सवाल उपस्थित करीत दोन्ही सरकारचे वाभाडे काढले. सध्या राजकीय संकट आहे. मात्र पाठीशी उभा राहा आणि आगामी निवडणुकीत पक्षाचा विचार सर्वसामान्य जनतेच्या मनात रुजवावा असे भावनिक आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थितांना केले.
आमदार रोहित पवार म्हणाले, कालचा निर्णय असंविधानिक आहे. मागील अनेक दिवसांपासून देशाचे संविधान बाजूला ठेवण्याचा प्रताप भाजपाकडून होत आहे. लढण्याची भूमिका घेत लढूयात. २०२४ ला भाजपाची सत्ता आल्यास ते स्वत:ला योग्य वाटेल, असे संविधान निर्माण करून लोकशाही राहील का नाही ? असा बदल घडवतील याची भीती वाटते. जे भाजपाबरोबर गेले ते लोकनेते राहिले नाही. त्यांचे अस्तित्व संपवून टाकण्याचे षडयंत्र भाजपा करीत आहे. लोकसभेला जागा पाहून त्यांच्या बरोबर राहतील की नाही याची भीती भाजपासोबत गेलेल्यांना सतावत आहे. निवडणूक आयोगाचा निकाल अपेक्षित होता. त्यास कोणीही घाबरून जाऊ नये. आपल्याला पवार साहेबांच्या विचार पुढे घेऊन जायचा आहे. उद्या पक्षाचे चिन्ह सर्वसामान्य जनतेचे प्रतीक राहील. मी जर उद्या तुरुंगात गेलो तर माझ्या मतदारसंघाचे कुटुंब साहेबांचा विचार पुढे घेऊन जातील हा विश्वास आहे. जखमी वाघ असणारे पवार साहेबांचा झंझावात आगामी काळात या फोडाफोडीच्या महायुतीला धडा नक्की शिकवेल, असा विश्वास आहे. विचार आणि एकीची ताकद असेल तर ह्या शासकीय यंत्रणेला धडा सर्वसामान्य जनता देईल.