नगर : विश्वचषक एकदिवसीय स्पर्धेत आज भारत (India) व ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात साखळी सामना चेन्नई येथे खेळविण्यात आला. या सामन्यात विराट कोहली (८५ धावा) व के.एल. राहुल (नाबाद ९७) यांच्या खेळीच्या जोरावर भारताने सहा गडी राखून ऑस्ट्रेलियावर विजय मिळविला.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ४९.३ षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात १९९ धावाच जमवू शकला. स्मिथने सर्वाधिक ४६ धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन, कुलदीप यादव व जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन तर मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या व आर. अश्विन यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
२०० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा, इशान किशन व अय्यर हे तिघेही खाते न उघडता परतले. त्यानंतर मात्र, विराट कोहली व के.एल. राहुल यांनी जबाबदारीने सावध खेळत भारताला विजय मिळवून दिला. भारतीय संघाने ४१.२ षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात २०१ धावा केल्या. हार्दिक पंड्या ११ धावा करत नाबाद राहिला. के.एल. राहुल सामनावीर ठरला.