Leopard : नगर : नगर तालुक्यातील देहरे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभाग (Forest Department) आणि ग्रामस्थांच्या अर्ध्या तासांच्या अथक प्रयत्नांनी सुखरुप सुटका करण्यात आली. बिबट्याला (Leopard) निसर्गाच्या (Nature) अधिवासात सुखरुप साेडल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
नक्की वाचा : ‘फिल्डींग कशी लावायची ते माझ्यावर सोडा’: राधाकृष्ण विखे पाटील
नगर तालुक्यातील देहरे येथे जवळपास पन्नास फूट खोल विहिरीत पडल्याचे शेतमालक नामदेव पठारे यांच्या लक्षात आले. पठारे व ग्रामस्थ महेश काळे यांनी तातडीने वनविभागाचे जिल्हा मानद वन्य जीव संरक्षक तथा जिल्हा व्याघ्र संरक्षण समिती सदस्य मंदार साबळे यांना कळवले. माहिती मिळताच जिल्हा उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाचे प्रभारी सहायक वनसंरक्षक व वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड, साबळे तसेच रेस्क्यू पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
हे देखील वाचा : आता मुलांच्या नावापुढे वडिलांआधी आईचे नाव लागणार; उपमुख्यमंत्री अजित पवार
विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाच्या रेस्क्यू टीम व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आज सकाळी बाराच्या सुमारास सुटका केली. सुमारे अर्ध्या तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्यास सुखरूप बाहेर काढले. तेथील ग्रामस्थ सोमनाथ काळे यांनी विहिरीत कुठेही कठडा नसल्याने जाड दोरखंड विहिरीत सोडल्याने बिबट्यास आधार मिळाला. पठारे यांनीही त्यास पाण्यात शॉक बसू नये, म्हणून वीजपंपाचा विद्युत पुरवठा तातडीने खंडित केला. हा साधारण दोन वर्षे वयाचा बिबट्या होता. त्यास बाहेर येता यावे, यासाठी विहिरीत दोरखंड व दोरीची शिडी सोडण्यात आली होती. त्याच्या मदतीने वर येत बिबट्याला निसर्गाच्या अधिवासात सुखरुप साेडण्यात आले.
बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या वनरक्षक राजश्री राऊत, मनेष जाधव, विजय चेमटे, अमोल गोसावी, बाळू दाणी, दिनकर शिंदे, संदीप ठोंबरे, बाबासाहेब बडेकर, संजय सरोदे, नवनाथ मते यांनी परिश्रम घेतले. या भागात बिबट्यांचा वावर आहे. त्यामुळे शेतात एकटे जाणे टाळावे व लहान मुलांना एकटे सोडू नये, अशा सूचना राठोड व साबळे यांनी ग्रामस्थांना केल्या.